उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये दोन ट्रक एकमेकांवर आदळल्याने भीषण अपघात झाला. एका ट्रकमध्ये बाईक, तर दुसऱ्या ट्रकमध्ये मदर डेअरीचे देशी तूप होतं. अपघात होताच तुपाचे पाऊच रस्त्यावर पडले. हे पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी व स्थानिक नागरिकांनी पाऊच जमा करून पळ काढण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे घटनास्थळी वाहतूक कोंडी झाली होती.
हे संपूर्ण प्रकरण झाशीच्या सिपरी बाजार पोलीस स्टेशन हद्दीतील रॉयल सिटी कॉलनीजवळ आहे. जिथे काल दोन ट्रक एकमेकांना धडकले. दोन्ही ट्रकमध्ये भरलेल्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर तेथून जाणाऱ्या व आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी तुपाने भरलेल्या ट्रकमधून तुपाचे शेकडो पाऊच लंपास केले. अपघाताची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर लोकांना हटवून तुपाचे पाऊच सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले.
काहीजण आपल्या गाडीच्या डिक्कीमध्ये तुपाची गोणी ठेवत होते तर काहीजण पोत्यात आणि बॅगेत भरत होते. तूप भरलेल्या ट्रकचा चालक राहुल याने सांगितलं की, फायनान्स कंपनीच्या लोकांनी ट्रक महामार्गावर थांबवला होता आणि त्याचे कागदपत्रे तपासत होते. ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. त्यानंतर मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकने बाजूने तुपाने भरलेल्या ट्रकला धडक दिली.
तुपाने भरलेल्या ट्रकचं त्यामुळे एका बाजुने नुकसान झालं. तूप जमिनीवर वाहू लागले. वाया गेलेल्या तुपाची किंमत लाखो रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. रस्त्यावर पडलेल्या तुपाचे पाऊच रस्त्यावरून जाणाऱ्यांनी उचलण्यासाठी झुंबड केली. काही वेळाने सिपरी बाजार पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. ट्रक चेन्नईहून दिल्लीला तूप घेऊन जात होता. वाटेत दुसऱ्या ट्रकची धडक झाली. तक्रारीच्या आधारे कारवाई केली जात आहे.