उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लहचूरा पोलीस स्टेशन परिसरात वीज विभागाच्या टीमला कोंडून ठेवण्यात आल्याची घटना घडली. गावामध्ये काही लोकांनी वीज विभागाच्या टीमला घेरल्यानंतर टीमने पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली आणि वीज विभागाच्या टीमला गावातून सुखरुप बाहेर काढलं. नयागावमध्ये वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी कँप लावला होता. यामध्ये ज्यांनी बिल भरल नव्हतं त्यांचं वीज कनेक्शन तोडण्यात आलं. यावेळी गावातील काही गुंडांनी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांशी गैरवर्तन करत काही लोकांना कोंडून ठेवलं.
वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी लहचूरा पोलिसांना आपल्याला कोंडून ठेवल्याची माहिती दिली. अधिकारी देवेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, वीज विभागाने नयागाव येथे कॅम्प लावला होता, मात्र महत्त्वाचं काम असल्याने मी परत आलो. टीम तेथील थकबाकीदारांचं कनेक्शन तोडत होती.
दरम्यान, गावातील काही लोकांनी लाइनमन व कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवलं. तसेच काही लोकांच्या बाईकही घेतल्या. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कसंतरी कर्मचाऱ्यांना गावातून बाहेर काढलं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.