झारखंडच्या धनबादमध्ये हाजरा हॉस्पिटलमध्ये काल रात्री लागलेल्या आगीत दोन डॉक्टरांसह सहा जणांचा मृत्यू झाला. यामध्ये डॉक्टर दाम्पत्य विकास हाजरा आणि डॉ. प्रेमा हाजरा यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे दुसऱ्या मजल्यावर आग लागली आणि हळूहळू हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरही आग लागली. घटनेच्या वेळी बहुतांश लोक गाढ झोपेत होते.
आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर करण्यात आला पण आग इतकी भीषण होती आणि खोलीत खूप धूर होता की जीव वाचवणे कठीण झाले. अग्निशमन विभागाला आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी रुग्णालयातील दोन्ही बाजूंच्या एकूण 9 जणांना बाहेर काढलं. या सर्वांना जवळच्या पाटलीपुत्र नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेबाबत रुग्णालयाच्या व्यवस्थापकाने सांगितले की, सध्या आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे समजते. आगीच्या वेळी गॅसने भरलेला सिलिंडर स्वयंपाकघरातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला, अन्यथा हा अपघात आणखी भीषण होऊ शकला असता, असे त्यांनी सांगितले. सुरक्षेची खबरदारी लक्षात घेऊन प्रशासनाने बाहेरील लोकांना वरच्या मजल्यावर जाण्यास मनाई केली.
डॉ. प्रेमा हाजरा आणि त्यांचे पती डॉ. विकास हाजरा यांच्या मृत्यूची बातमी समजताच काही रुग्णांचे नातेवाईक रूग्णालयात पोहोचले. प्रेमा हाजरा या गरिबांसाठी देवदूत होत्या, त्या सर्वांची काळजी घ्यायच्या, त्यांच्या जाण्याने गरीब रुग्णांचे खूप नुकसान झाले आहे, असे कोलकाताहून आलेल्या कुटुंबातील एका सदस्याने भावूकपणे सांगितले. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"