लोकसभा निवडणुकीनंतर देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जात असलेल्या महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचं बिगुल आज वाजलं. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राबरोबरच झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. झारखंडमध्ये दोन टप्प्यांत विधानसभेची निवडणूक होणार असून, २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राबरोबरच निकाल जाहीर होणार आहे.
झारखंडमध्ये १३ आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होईल, अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली आहे. झारखंडमध्ये आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार झारखंडमधील पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर तर दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर आहे. तर पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्जांची छाननी २८ ऑक्टोबर आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांची छाननी ही ३० ऑक्टोबर रोजी होईल. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख ३० ऑक्टोबर तर दुसऱ्या टप्य्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १ नोव्हेंबरपर्यंत असेल.
तर झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान हे १३ नोव्हेंबर रोजी तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर मनमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये मुख्य लढत होणार आहे.