Jharkhand Assembly Election 2024 :झारखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी(दि.20) साहिबगंज येथून भाजपच्या परिवर्तन यात्रेला सुरुवात केली. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ताधारी हेमंत सोरेन सरकार आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. 'ही परिवर्तन यात्रा झारखंडमधील प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात जाणार आहे. तुम्ही राज्यात भाजपचे सरकार बनवा, राज्यातील घुसखोरांना उलटे टांगण्याचे काम आम्ही करू,' अशी प्रतिक्रिया शाहंनी दिली.
शाह म्हणाले की, झारखंड मुक्ती मोर्चा, लालू प्रसाद यादव आणि राहुलबाबांच्या काँग्रेस पक्षाची व्होट बँक घुसखोर आहे. व्होट बँकेच्या भीतीने ते घुसखोरांना थांबवत नाहीत. झारखंडची निर्मिती माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केली होती, मात्र येथे झारखंड मुक्ती मोर्चाच्या हेमंत सोरेन सरकारने लोकहिताऐवजी घुसखोरांच्या कल्याणाची योजना बनवली आणि हे सरकार त्याच योजनेवर काम करत आहे.
झारखंड ही आदिवासींची भूमी असून नरेंद्र मोदी आणि भाजपच या भूमीला घुसखोरांपासून वाचवू शकतात. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी भाजप आणि नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणारे सरकार येथे स्थापन करावे लागेल. आम्हाला फक्त सरकार बदलायचे नाही, तर झारखंडचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. भ्रष्ट सरकार बदलून भ्रष्टाचारमुक्त सरकार आणणे, हे आमचे प्राधान्य आहे. घुसखोरांच्या हातून आदिवासी समाज आणि त्यांची संस्कृती नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी नवे सरकार आणावे लागेल. भ्रष्टाचाराचे सरकार हटवूनच राज्यात परिवर्तन घडेल, असेही शाह म्हणाले.