झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी इंडिया आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. यादरम्यान, दोन्हीकडच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपही सुरू आहेत. त्यात काँग्रेसचे नेते आणि उमेदवार इरफान अंसारी यांनी भाजपा नेत्या सीता सोरेन यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवरून वातावरण तापलं आहे. या वक्तव्यानंतर भाजपा नेत्यांनी सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा आणि जेएमएमला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सीता सोरेन ह्या भावूक झाल्याचे दिसून आले.
सीता सोरेन ह्या जामताडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. येथे काँग्रेसने इरफान अंसारी यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, सीता सोरेन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर इरफान अंसारी यांच्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, ‘’इरफान अंसारी मला उमेदवारी जाहीर झाल्यापासून मला लक्ष्य करत आहेत. मात्र उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माझ्याबाबत केलेली अपमानास्पद टिप्पणी ही अस्वीकारार्ह आहे. हा आदिवासी समाजातील महिलांचा अपमान आहे. यासाठी आदिवासी समाज त्यांना कधीही माफ करणार नाही. माझे पती आज हयात नाही आहेत. त्यामुळे अंसारी…’’, असं म्हणत सीता सोरेन यांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली.
काँग्रेस नेते इरफान अंसारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सीता सोरेन यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यांनी सीरा सोरेन यांचा बोरो खेळाडू आणि रिजेक्टेड माल असा उल्लेख केला होता. या वक्तव्याविरोधात सीता सोरेन यांनी सोशल मीडियावरून संतप्त प्रतिक्रिया दिली होती. तसेच इरफान अंसारी यांचा व्हिडीओ शेअर करत काँग्रेसवर टीका केली होती. काँग्रेस उमेदवार इरफान अंसारी यांनी माझ्याविरोधात जी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, त्यासाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे. ते माझ्यावर वैयक्तिक टीकाटिप्पणी करत असतात. मात्र यावेळी त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. इरफानजी माफी मागा, अन्यथा विरोधासाठी तयार राहा, असा इशारा त्यांनी दिला होता.
सीता सोरेन ह्या झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख शिबू सोरेन यांचे ज्येष्ठ पुत्र दिवंगत दुर्गा सोरेन यांच्या पत्नी आहेत. यावर्षी मुख्यमंत्रिपदावरून कुटुंबात वाद झाल्यानंतर दुर्गा सोरेन यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता.