Jharkhand Assembly Election 2024, BJP Himanta Biswa Sarma on Hindu vs Muslim: झारखंड विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. भाजपाचे झारखंड निवडणूक सहप्रभारी व आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राज्यातील एका निवडणूक प्रचारसभेला संबोधित करताना हेमंत सोरेन सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, JMM-काँग्रेसचा उद्देश हिंदूंच्या मतांचे जातीच्या आधारावर विभाजन करणे आणि एका विशिष्ट समुदायाची १००% मते घेणे हाच आहे. झारखंडमध्ये जे काही चालले आहे, ते असेच चालू राहिले तर भविष्यात हिंदूंची लोकसंख्या ५० % होईल आणि घुसखोरांची लोकसंख्याही जवळपास सारखीच होईल. त्यामुळे ही निवडणूक आपल्या अस्मितेची निवडणूक आहे. घुसखोरांना हुसकावून लावणे आपल्याला गरजेचे आहे.
गोंधळ घालूनच दाखवा, मी पण बघतो...
आसामचे मुख्यमंत्री पुढे म्हणाले, "आसाममधील काही लोक म्हणत होते की आम्ही मदरसा बंद करू शकणार नाही. मी म्हणालो की भारताला सध्या मुस्लीम धर्मगुरूंची नव्हे तर डॉक्टर-इंजिनियरची गरज आहे. त्यावर ते म्हणत होते की, असे केले तर गदारोळ-गोंधळ होईल. मी त्यांना ठणकावून सांगितले की, मला एकदा तुम्ही गोंधळ घालूनच दाखवा, मग मी पण बघतो कोण कसा गोंधळ घालतो. त्यानंतर मदरसे बंद होते, पण कोणताही गोंधळ झाला नाही. राम मंदिर बांधण्याच्या वेळीही हे लोक असंच म्हणत होते की गोंध-गदारोळ होईल, पण काय झालं? जेव्हा हिंदू एकसंध राहतो, तेव्हा कुठलाही गोंधळ, गदारोळ होत नाही."
इंडिया आघाडीने हिमंता यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे केली तक्रार
भाजपाचे झारखंड निवडणूक सहप्रभारी आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या विधानावर विरोधी इंडिया ब्लॉकने आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून सरमा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. INDIA ब्लॉकच्या शिष्टमंडळाने झारखंडचे मुख्य निवडणूक अधिकारी रवी कुमार यांची रांची येथे भेट घेतली आणि हिमंता बिस्वा सरमा यांच्या कथित प्रक्षोभक आणि फुटीरतावादी भाषणांसाठी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.