झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत झारंखडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरोधात भाजपाने गमलियाल हेम्ब्रोम यांना उतरविले आहे. २०१९ ला हेम्ब्रोम यांनी आजसू पक्षाकडून निवडणूक लढविली होती, यात त्यांना केवळ अडीज हजार मते मिळाली होती.
दोनच उमेदवारांची दुसरी यादी भाजपाने जाहीर केली आहे. टुंडी मतदारसंघातून भाजपाने विकास महतो यांना उमेदवारी दिली आहे. सोरेन यांचा बरहेट हा मतदारसंघ आहे. झारखंडमध्ये १३ आणि २० नोव्हेंबर असे दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.
सोरेन हे साहिबगंज जिल्ह्यातील बरहेटचे आमदार आहेत. त्यांनी २०१९ मध्ये भाजपाच्या सायमन माल्टो यांना २५,७४० मतांनी हरविले होते. हेम्ब्रम चौथ्या क्रमांकावर होते. सोरेन यांनी दुसका आणि बरहेट या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढविली होती.
भाजपाने पहिल्या यादीत झारखंडमध्ये ६६ उमेदवार जाहीर केले होते. यात भाजपा प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी यांना धनवारमधून तर विधानसभा विरोधीपक्ष नेते अमर कुमार बाऊरी यांना चंदनकियारी जागेवरून उमेदवारी देण्यात आली आहे. हेमंत सोरेन यांची साथ सोडलेले माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांना सरायकेलाहून तिकीट देण्यात आले आहे. त्यांच्या मुलाला बाबुलाल सोरेन यांना घाटशिला येथून लढविण्यात येत आहे.
झामुमोचे नेते शिबू सोरेन यांच्या सुनेला सीता सोरेन यांना भाजपाने जामताडा येथून उमेदवारी दिली आहे. माजी केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांच्या पत्नीला पोटका तर ओडिशाचे राज्यपाल रघुबर दास यांच्या सुनेला जमशेदपूरमधून तिकीट देण्यात आले आहे.