महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेली ‘’बटेंगे तो कटेंगे’’ तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली ‘’एक है तो सेफ है’’ या घोषणा खूप गाजल्या. या घोषणांना साधूसंतांनीही समर्थन दिलं होतं. दरम्यान, या घोषणांवरून राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी भाजपा आणि साधूसंतांवर टीका केली आहे.
या लोकांचं गरिबीशी काहीही देणंघेणं नाही. भाजपाचे लोक दररोज असं चुकीचं बोलत असतात. तसेच साधू संतांनी या घोषणांना पाठिंबा देणं चुकीचं आहे, असे लालूप्रसाद यादव म्हणाले. दरम्यान, झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत आणि बिहारमधील चार जागांवर होत असलेल्या पोटनिवडणुकीत विजय मिळेल, असा विश्वासही लालूप्रसाद यादव यांनी व्यक्त केला.
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठीचा प्रचार सोमवारी थांबला. दुसऱ्या टप्प्यात एकूण ३८ जागांवर मतदान होणार आहे. या ३८ जागांपैकी २३ जागा इंडिया आघाडीच्या ताब्यात आहेत. तर १५ जागा एनडीएच्या ताब्यात आहेत. दुसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेले अनेक मतदारसंघ हे झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जातात. दुसरीकडे एनडीएसमोर मागच्या निवडणुकीच्या तुलनेत चांगली कामगिरी करण्याचं आव्हान आहे.