Jharkhand Assembly Election 2024: झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची धामधूम सुरु आहे. दरम्यान, झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) नेते आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मोठा धक्का बसला आहे. झारखंड निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी हेमंत सोरेन यांच्या समर्थकांपैकी एक असलेले मंडल मुर्मू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
जेएमएम आणि हेमंत सोरेन यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मंडल मुर्मू हे शहीद सिदो-कान्हू यांचे वंशज असून त्यांनी रविवारी (३ नोव्हेंबर) भाजपमध्ये प्रवेश केला.१८५५ मध्ये इंग्रजांविरुद्ध झालेल्या हुल क्रांतीचे सिदो-कान्हू हे नेते होते.दरम्यान, मंडल मुर्मू यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वातावरण बदलणार असल्याचा दावा केला जात आहे. मंडल मुर्मू यांना आपल्या पक्षात थांबवण्यासाठी जेएमएमने शक्य ते सर्व प्रयत्न केले, परंतु काहीही झाले नाही.
दरम्यान, हेमंत सोरेन यांनी बरहेट विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केल्यानंतर, त्यांचे समर्थक असलेले मंडल मुर्मू यांना पोलिसांनी डुमरी येथे रोखले होते. मंडल मुर्मू ज्या वाहनातून जात होते, ते वाहन थांबवून तपासणी करण्यात आली. यानंतर झारखंडच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी डुमरीमध्ये तपासणी करताना निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन केले नसल्याचे सांगितल्याने या प्रकरणाला नवे वळण लागले.
झारखंडच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाहन तपासणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले नाही. यासोबतच वाहनात आक्षेपार्ह साहित्य आढळल्याशिवाय कुणालाही ताब्यात घेता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या विधानानंतर भाजपने हेमंत सोरेन आणि जेएमएमला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मंडल मुर्मू यांची भेट घेतली. या भेटीने संपूर्ण राजकीय खेळी बदलली आणि अखेर ३ नोव्हेंबर रोजी मंडल मुर्मू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, झारखंडमधील ८१ सदस्यीय विधानसभेची निवडणूक १३ आणि २० नोव्हेंबरला दोन टप्प्यात होणार असून, मतमोजणी २३ नोव्हेंबरला होणार आहे.