रांची: झारखंड विधानसभेच्या 81 जागेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे. 81जागांपैकी 71 जागेंच्या कलांमध्ये काँग्रेस आघाडीने 40 जागांवर मुसंडी मारली आहे. तर भाजपाने सुरुवातीच्या कलांमध्ये 30 जागांवर आघाडीवर आहे. बहुमतासाठी 41 जागांची आवश्यकता असणार आहे.
महाराष्ट्रानंतर आता झारखंड हे राज्यही भारतीय जनता पक्षाच्या हातातून जाण्याची चिन्हे दिसत आहेत. झारखंड विधानसभेसाठीचे पाचव्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी संपल्यानंतर एक्झिट पोलचे जे निष्कर्ष जाहीर झाले, त्यातून भाजपला तिथे पुन्हा सत्ता मिळण्याची शक्यता नाही. मात्र, तिथे कदाचित कोणालाच बहुमत मिळणार नाही आणि विधानसभा त्रिशंकू असू शकेल, असा एक्झिट पोलचा अंदाज आहे.
झारखंडमध्ये 30 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान पाच टप्प्यांत 81 जागांसाठी मतदान झाले होते. नक्षलग्रस्त राज्य असल्याने कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. या निवडणुकीत 1215 उमेदवार रिंगणात आहेत. सर्वात आधी तोरपा आणि चंदनकियारी या जागांचे निकाल येणार आहेत कारण या जागांची मतमोजणी 13 टप्प्यात तर अन्य जागांवर 28 टप्प्यांत मतमोजणी होणार आहे.