झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या दोन दिवसापासून ईडी त्यांना चौकशीसाठी बोलवत आहे. आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री सोरेन यांनी ईडीविरोधात एफआयआर दाखल केला आहे. सोरेन यांच्या वतीने एसटी-एससी पोलीस ठाण्यात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात ही एफआयआर दाखल केली आहे. दिल्लीत ईडीच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी करत आहे. त्यांची ११ दिवसांच्या कालावधीत दुसऱ्यांदा चौकशी करण्यात येत आहे. कडेकोट बंदोबस्तात ईडी अधिकाऱ्यांचे पथक चार वाहनांतून दुपारी १.२० वाजता कणके रोडवरील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले.
हेमंत सोरेन यांच्या घरातून ३६ लाख रुपये रोख, एक बीएमडब्ल्यू कार आणि काही कागदपत्रे जप्त केली होती. जमीन घोटाळ्यासोबतच त्यांची चौकशीही केली जाणार आहे.
“पश्चिम बंगालमध्ये आपल्याला काँग्रेस-भाजपाला पराभूत करायचे आहे”; ममता बॅनर्जींचा निर्धार
रांचीच्या बडागाईन भागातील एका भूखंडाच्या खरेदी-विक्रीशी संबंधित ईडी चौकशी सुरू आहे. मुख्यंत्री हेमंत सोरेन यांनी ही जमीन बेकायदेशीरपणे संपादन केल्याची माहिती ईडीला मिळाली आहे. मात्र, सोरेन यांनी ईडीला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ही जमीन आपली नाही आणि याच्याशी आपला काहीही संबंध नाही. ही भुईंहरी नेचरची जमीन आहे आणि ती विकत घेता येत नाही. ही जमीन गेल्या पाच दशकांपासून आदिवासी पाहन कुटुंबाच्या मालकीची आहे.
चौकशीदरम्यान JMM कार्यकर्ते आणि समर्थकांच्या निषेधाची शक्यता लक्षात घेऊन, मुख्य निवासस्थान, राजभवन, ईडी कार्यालयासह रांचीच्या अनेक संवेदनशील भागात कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.