नवी दिल्ली: कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन अडचणीत सापडले आहेत. सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने सकाळी ७ वाजल्यापासून दिल्लीतील शांती निकेतनमधील हेमंत सोरेन यांच्या घरासह ३ ठिकाणी छापे टाकण्यास सुरुवात केली, जी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
ईडीच्या टीमने जेव्हा छापे टाकले, त्यावेळी हेमंत सोरेन घरी नव्हते. त्यानंतर ईडीने निघताना त्यांची बीएमडब्ल्यू कारही जप्त केली. ईडीने जप्त केलेली कार एचआर (हरियाणा) क्रमांकाची आहे. त्यामुळे हेमंत सोरेन बेपत्ता झाल्याची चर्चा रंगली आहे. खबरदारी घेत ईडीच्या टीमने हेमंत सोरेन यांच्याबाबत विमानतळावर अलर्टही पाठवला आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना रांचीमध्ये एका ठिकाणी जमण्यास सांगण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.
दरम्यान, भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर निशाणा साधला आहे. दुबे यांनी म्हटले आहे की, हेमंत सोरेन यांनी जेएमएम आणि काँग्रेस तसेच सहयोगी आमदारांना रांचीला बोलावले आहे. ते पुढे म्हणाले की, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव आला आहे.
दोन दिवसांपूर्वी सोरेन दिल्लीला रवाना
हेमंत सोरेन हे शनिवारी (२७ जानेवारी) रात्री अचानक दिल्लीला रवाना झाले होते. त्यांनी चार्टर फ्लाइटने उड्डाण केले होते. त्यानंतर काही राजकीय बैठका घेण्यासाठी ते दिल्लीला गेल्याचे सांगण्यात आले. तेथे ते कायदेशीर सल्लाही घेणार आहे. यापूर्वी, ईडीने त्यांना १०वे समन्स पाठवले होते आणि २९ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान हजर राहण्यास सांगितले होते.
नेमकं प्रकरण काय?
झारखंडमधील माफियांकडून जमिनीच्या मालकीच्या बेकायदेशीर बदलाचे मोठे रॅकेट चालवले जात असल्याचा आरोप आहे. ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. याप्रकरणी आतापर्यंत १४ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये २०११च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी छवी रंजन यांचाही समावेश आहे, ज्यांनी यापूर्वी राज्याच्या समाजकल्याण विभागाचे संचालक आणि रांचीचे उपायुक्त म्हणून काम केले होते. ४८ वर्षीय झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) नेत्याची ईडीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राज्यातील कथित बेकायदेशीर खाणकामाशी संबंधित आणखी एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी केली होती.