रांची - ED Arrest Hemant Soren ( Marathi News ) कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पथक झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी पोहचले. जवळपास ४० तासानंतर अचानक सोरेन दिल्लीहून रांचीत परतले. आज झारखंडमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. ईडीच्या चौकशीत अडकलेले मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिला. त्यानंतर चंपई सोरेन यांना झारखंडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले आहे. हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर त्याची पत्नी कल्पना सोरेन यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सोपवली जातील, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे चंपई सोरेन यांच्याकडे सोपवली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जमीन घोटाळ्याप्रकरणी हेमंत सोरेन यांची ईडीकडून चौकशी सुरू असून अशा परिस्थितीत सोरेन १५ दिवस रांचीमध्ये ईडीच्या कोठडीत राहू शकतात असं बोललं जात आहे. सोरेन यांनी दिल्ली ते रांची असा १२५० किमीचा प्रवास केला. त्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाच्या वरिष्ठ नेत्यांची आणि सहकारी आमदारांची सोरेन यांनी बैठक घेतली. बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत चंपई सोरेन यांना सभागृह नेता म्हणून निवडण्यात आले.
कोण आहे चंपई सोरेन?
चंपई सोरेन यांचा झारखंडमधील कोल्हान भागात बराच प्रभाव आहे, म्हणूनच त्यांना 'टायगर' म्हणून ओळखले जाते. हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर किंवा अटकेनंतर त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन या सीएम होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती, मात्र आता चंपई यांना मुख्यमंत्री बनवले जात आहे. चंपई सोरेन यांची झारखंडच्या राजकारणात मोठी भूमिका मानली जाते. यामुळेच हेमंत सोरेन यांच्या पत्नीसह मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत असलेल्या इतर चेहऱ्यांपेक्षा त्यांचा पगडा भारी आहे.