झारखंडच्या राजकारणात गेल्या महिन्यात मोठा भूकंप येण्याची शक्यता होती. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आमदारकीच धोक्यात आली होती. यामुळे सोरेन यांनी आपले आणि मित्रपक्षाच्या आमदारांना छत्तीसगढला नेऊन ठेवले होते. आज सोरेन यांनी झारखंड विधानसभेत बहुमत चाचणी जिंकली आहे.
सोरेन यांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलविले होते. त्यापूर्वीच त्यांनी रविवारी रात्री आमदारांची बैठक बोलावली होती. सोरेन यांना ४८ मते मिळाली आहेत. तर विरोधी पक्ष भाजपाने मतदानावर बहिष्कार टाकला. विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांनी भाजपाची रणनीती ठरविण्यासाठी सकाळी नऊच्या सुमारास बैठक घेतली होती. विश्वासदर्शक ठरावासाठी विशेष अधिवेशन बोलावणे समजण्यापलीकडे आहे. लाभाच्या पदाच्या मुद्द्यावरून पक्ष सोरेन यांचा राजीनामा मागणार असल्याचे मरांडी म्हणाले.
कालच आमदार रांचीमध्ये परतले...झारखंडमधील सत्ताधारी यूपीए आघाडीचे सुमारे 30 आमदार रायपूरला गेले होते. ते सोमवारी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सहभागी होण्यासाठी रविवारी दुपारी रांचीला परतले. या आमदारांना 30 ऑगस्टपासून रायपूरजवळील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते. हेमंत सोरेन सरकारला 49 आमदारांचा पाठिंबा आहे. 81 सदस्यांच्या सभागृहात सर्वात मोठा पक्ष असलेल्या JMMकडे सध्या 30 आमदार आहेत, काँग्रेस 18 आणि RJD 1, तर प्रमुख विरोधी पक्ष भाजपकडे 26 आमदार आहेत.