"कंगना राणौतच्या गालापेक्षा जास्त सुंदर रस्ते बनवू"; काँग्रेस आमदाराचं वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 08:31 PM2022-01-14T20:31:15+5:302022-01-14T20:42:21+5:30
Congress Irfan Ansari And Kangana Ranaut : आपल्या परिसरातील रस्त्यांची तुलना त्यांनी अभिनेत्री कंगना राणौतच्या गालासोबत केली आहे.
नवी दिल्ली - काँग्रेसचे एक आमदार सध्या आपल्या वादग्रस्त विधानामुळे जोरदार चर्चेत आले आहेत. झारखंडच्या जामताडाचे डॉ. इरफान अन्सारी (Congress MLA Irfan Ansari) आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते वादात सापडण्याची शक्यता आहे. आपल्या परिसरातील रस्त्यांची तुलना त्यांनी थेट अभिनेत्री कंगना राणौतच्या (Kangana Ranaut) गालासोबत केली आहे. अन्सारी यांची जीभ घसरली असून त्यांनी "कंगना राणौतच्या गालापेक्षा जास्त सुंदर रस्ते आम्ही बनवणार" असं म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
"अभिनेत्री कंगना राणौतच्या गालापेक्षा जामताडाचे रस्ते जास्त सुंदर बनवले जातील. या रस्त्यांमुळे आदिवासी मुले, तरुण आणि व्यापारी वर्गाला फायदा होईल. आमदार अन्सारी यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघासाठी सरकारकडून 14 रस्ते मंजूर करवून घेतले आहेत. या रस्त्यांच्या बांधकामासंदर्भात बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. जामताडा येथील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण हे आपले प्राधान्य असल्याचं देखील म्हटलं आहे. तसेच परिसरातील आदिवासीबहुल गावातील रस्ते जागतिक दर्जाचे करण्याचा आपला मानस असल्याचं देखील सांगितलं.
"भाजपाने राज्याला लुटण्याचं काम केलं"
जामताडामधील जनता यापुढे रस्त्यावरील धूळ अनुभवणार नाही, असा दावा देखील आमदारांनी केला आहे. अन्सारी यांनी यावेळी आधीच्या रघुवर दास सरकारवर जोरदार हल्लाबोल करत टोला लगावला आहे. भाजपाने राज्याला लुटण्याचं काम केलं आहे. भाजपाच्या काळात जसे रस्ते झाले तसे रस्ते आता होणार नाहीत. तर त्याहून चांगले रस्ते केले जातील असं देखील अन्सारी यांनी म्हटलं आहे. यासोबतच लवकरचं रस्त्याचं काम सुरू होणार असल्याचं सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महाराष्ट्रातही काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारचं एक विधान करण्यात आलं होतं. शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या एका विधानाने नव्या वादाला तोंड फुटलं होतं. जळगावमध्ये आयोजित जाहीर सभेत गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना रस्त्यांची तुलना थेट ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी यांच्या गालांशी केली आहे. गुलाबरावांच्या या विधानानंतर राज्याचं राजकारण तापलं होतं. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर कारवाईचा इशारा दिला होता.