कोविशील्ड लसीने जीवनाची आस सोडलेल्या 55 वर्षीय दुलारचंद मुंडा (Dularchand Munda) यांचा जगण्याचा मार्ग सुखकर केला आहे. कोविशील्ड लस घेतल्याने 5 वर्षांपासून जीवनाची लढाई लढणाऱ्या मुंडा यांचा बोबडी वळलेला आवाजच बरा झाला नाही, तर त्यांच्या शरीरालाही नवसंजीवनी मिळाल्याची चर्चा या भागातील लोकांत आहे. झारखंडमधील (Jharkhand) बोकारो जिल्ह्यातील पेटरवार ब्लॉकमधील उतासारा पंचायतीअंतर्गत येत असलेल्या सलगाडीह गावात हा चमत्कार घडला आहे. पंचायतीच्या प्रमुख सुमित्रा देवी आणि माजी प्रमुख महेंद्र मुंडा यांनीही, हा लसीचा परिणाम असल्याचे म्हटले आहे. (Covishield vaccine became boon)
यासंदर्भात livehindustan.com ने दिलेल्या वृत्तानुसार, सलगाडीह गावातील दुलारचंद मुंडा हे पाच वर्षांपूर्वी रस्ते अपघातात गंभीर जखमी झाले होते. उपचारानंतर ते बरे तर झाला, पण त्याच्या शरीर काम करण्यास साध देत नव्हते. यामुळे त्यांची बोबडीही वळली होती. गेल्या वर्षभरापासून त्यांचे संपूर्ण जीवन खाटेवरच होते. त्यांना व्यवस्थित बोलताही येत नव्हते. ते कुटुंबातील एकमेव कमावणारे सदस्य असल्याने कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचाही मोठा प्रश्न उभा राहिला होता.
यासंदर्भात बोलताना वैद्यकीय प्रभारी डॉ.अलबेल केरकेट्टा म्हणाले, अंगणवाडी केंद्राच्या सेविकेने 4 जानेवारीला त्यांच्या घरी जाऊन त्यांना लस दिली होती आणि 5 जानेवारीपासून त्यांच्या शरीरात हालचाल करायला सुरुवात केली. केरकेट्टा म्हणाले, त्यांना मणक्याची समस्या होती. त्यांचे विविध प्रकारचे रिपोर्च आम्ही पाहिले. मात्र, आता हा एक तपासाचा विषय बनतो. तसेच सिव्हिल सर्जन डॉ. जितेंद्र कुमार म्हणाले, ही एक आश्चर्यचकित करणारी घटना आहे.