रांची : झारखंड विधानसभेच्या ३८ जागांसाठी दुसऱ्या व अंतिम टप्प्याचे मतदान २० नोव्हेंबरला होत आहे. सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाचे (झामुमो) नेते व विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
या टप्प्यात ५२८ उमेदवार रिंगणात आहेत. हेमंत सोरेन हे बरहाईट येथून लढत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने गमलियेल हेम्ब्रॉम यांना उमेदवारी दिली. त्याशिवाय हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना या गांदेय येथून, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी हे धनवाड येथून लढत आहेत. दुमका येथून झामुमोचे बसंत सोरेन यांच्याविरोधात भाजपचे सुनील सोरेन उमेदवार आहेत.
झारखंड विधानसभेत ८१ जागा असून, पहिल्या टप्प्यात ४३ जागांसाठी १३ नोव्हेंबरला मतदान झाले.
पोटनिवडणुकीचेही मतदान
चार राज्यांतील १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये २० नोव्हेंबरला पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशातील सर्वाधिक ९, पंजाबमधील ४, उत्तराखंड आणि केरळमध्ये प्रत्येकी एका मतदारसंघात मतदान होणार आहे.
१.२३ कोटी मतदार : या टप्प्यात ५३२ उमेदवारांपैकी ४७२ पुरूष तर ५५ महिला आहेत. एक उमेदवार तृतीयपंथी आहे. १.२३ कोटी मतदार या उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत.