Crime News :झारखंडच्या रांचीमधून गोळीबाराचे एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने रायफलच्या मदतीने एका बारमधील डीजे ऑपरेटरची हत्या केल्याचे सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडीओमध्ये अर्धनग्न अवस्थेतील एका व्यक्तीने बारमध्ये येऊन रायफलने डीजे ऑपरेटरची हत्या केली आणि तिथून आरामात निघून गेला. त्या व्यक्तीने केवळ डीजे ऑपरेटरच नाहीतर बाहेर आल्यानंतरही गोळीबार केल्याचे समोर आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आली आहे.
रांची इथल्या एक्स्ट्रीम बारमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. बारमध्ये घुसून आरोपीने पश्चिम बंगालमधील तरुणाची गोळ्या झाडून हत्या केली आहे. हा तरुण या बारमध्ये काम करायचा. संदीप प्रामाणिक उर्फ सँडी डीजे असे त्याचे नाव आहे. रविवारी मध्यरात्री हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. रात्री एक वाजण्याच्या सुमारास पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी संदीपला रुग्णालयामध्ये नेले. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
झारखंडच्या रांची येथील एक्स्ट्रीम बारमध्ये रविवारी रात्री पाच तरुण दारू पीत होते. यावेळी त्याचा डीजे संदीप उर्फ सँडी आणि बारमधील इतर कर्मचाऱ्यांशी वाद झाला. तिथल्या लोकांनी कसेबसे प्रकरण शांत केले आणि सर्व तरुण निघून गेले. त्यानंतर काही वेळाने बारमध्ये मद्यपान करणारे पाच तरुण परत आले, त्यावेळी बार बंद होता. त्यादरम्यान, डीजे संदीप व इतर कर्मचारी बारमधून बाहेर पडत होते. त्यानंतर एका व्यक्तीने रायफलने डीजे संदीपवर गोळी झाडली आणि तेथून निघून गेला.
सोमवारी सकाळी एक १९ सेकंदाचा व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये एक माणूस रात्री १:१९ मिनिटांनी एक्स्ट्रीम स्पोर्ट्स बारमधून बाहेर पडत असताना रायफलने संदीपवर गोळी चालवताना दिसत आहे. गोळी झाडल्यानंतर संदीप काही पाऊले मागे गेला आणि तिथेच कोसळला. गोळी झाडणाऱ्या व्यक्तीने शर्टही घातला नव्हता. त्याने केवळ चड्डी घातली होती आणि चेहरा झाकला होता.
दरम्यान, रात्री उशिरा बारमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेची चौकशी करण्यासाठी रांचीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त पोहोचले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी सीसीटीव्हीचा तपास सुरु केला आहे. याशिवाय बारमधील इतर कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात येत आहे. तसेच गोळीबार आणि खुनात सहभागी असलेल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.