रांची - झारखंडच्या छत्रा जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटदुखीमुळे बेजार झालेल्या दोन रुग्णांना सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी गर्भचाचणी (Pregnancy test) करण्यास सांगितले आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. सिमारियाच्या सरकारी रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल गांझू व कामेश्वर गांझू हे दोघे जण सिमारियाच्या सरकारी रुग्णालयात गेले होते. तेथील डॉ. मुकेश यांनी त्या दोघांना तपासले आणि काही चाचण्या करून घेण्यास सांगितले. कोणत्या चाचण्या ते त्यांनी लिहूनही दिले. त्यानुसार ते दोघे खासगी पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये गेले, तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांनी तुमची गर्भचाचणी करण्याचे लिहून दिले असल्याचे त्यांना सांगण्यात आले. हे ऐकून गोपाल गांझू व कामेश्वर गांझू हे दोघेही चक्रावून गेले.
गोपाल आणि कामेश्वर हे ऐकून ताबडतोब आपल्या गावी गेले आणि तिथे सर्वांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर गावकऱ्यांच्या सूचनेनुसार या दोघांनी डॉ. मुकेश यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मात्र, दोघांची गर्भचाचणी करावी, असे आपण लिहून दिले नव्हते. नंतर कोणी तरी कागदावर ते लिहिले असावे, असे डॉ. मुकेश यांनी सांगितले आहे.
डॉक्टर मुकेश कुमार यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत आपण या दोघांना एएनसी चाचणी करण्यास सांगितले नव्हते असे सांगितले आहे. तसेच 'माझ्यावरील सर्व आरोप खोटे असून माझी बदनामी करण्याचा हा एक डाव आहे. मी दिलेल्या प्रिस्क्रीप्शनमध्ये नंतर कोणीतरी त्या चाचण्या करण्याचा सल्ला लिहिला असण्याची शक्यता आहे' असं डॉक्टर मुकेश यांनी म्हटले आहे. रुग्णालय प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. यापूर्वी देखील याच राज्यातील घाटसियामधील सरकारी डॉक्टराने पोटदुखीवर इलाजासाठी आलेल्या 55 वर्षांच्या महिलेला गर्भनिरोधक (कंडोम) वापरण्याचा सल्ला दिला होता. हा प्रकार समजताच त्या डॉक्टरला सरकारी सेवेतून काढण्यात आले होते.