झारखंडमध्ये गेल्या 19 वर्षांत कुठल्याही राजकीय पक्षाला तोडता आलेली नाहीत ही मिथके
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 04:20 PM2019-12-23T16:20:43+5:302019-12-23T16:34:49+5:30
झारखंड राज्याची स्थापना झाल्यापासून गेल्या 19 वर्षांमध्ये आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये दोन मिथके तोडणे कुठल्याही राजकीय पक्षाला शक्य झालेले नाही.
रांची - झारखंड विधानसभा निवडणुकीचा कल आता जवळपास स्पष्ट होत आला आहे. संपूर्ण निकाल अद्याप हाती आला नसला तरी आतापर्यंतच्या कलांमधून भाजपाचा पराभव होणार असल्याचे आणि सर्वात मोठी आघाडी ठरलेल्या झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद आघाडीचे राज्यात सरकार स्थापन होणार असल्याचे जळपास निश्चित झाले आहे. मात्र राज्याची स्थापना झाल्यापासून गेल्या 19 वर्षांमध्ये आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये दोन मिथके तोडणे कुठल्याही राजकीय पक्षाला शक्य झालेले नाही.
ती मिथके म्हणजे झारखंडमधील विधानसभा निवडणुकीती यावेळीसुद्धा कुठल्याही राजकीय पक्षाला स्वबळावर बहुमत मिळवता आलेले नाही. एकीकडे स्बबळावर बहुमतासह सत्तेत येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. तर सत्तेसमिप पोहोचलेल्या झारखंड मुक्ती मोर्चालाही बहुमत मिळालेले नाही. आतापर्यंत आलेल्या कलांनुसार झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल आघाडी 47 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा 24 जागांवर आघाडीवर आहे.
तर दुसरे मिथक म्हणजे झारखंडमध्ये गेल्या 19 वर्षांत झारखंडमध्ये कुठलाही पक्ष सत्ता कायम राखू शकलेला नाही. भाजपा नेते रघुवर दास हे संपूर्ण पाच वर्षे झारखंडचे मुख्यमंत्रिपद सांभाळवणारे पहिले व्यक्ती ठरले. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात पक्ष सत्तेत पुनरागमन करेल अशी अपेक्षा भाजपा नेत्यांना होती. मात्र प्रत्यक्षात पक्षाला पराभव पत्करावा लागला.
देशात मोदी लाट जोरात असताना 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला झारखंडची सत्ता काबीज करण्यात यश आले होते. मात्र तेव्हाही भाजपाला स्वबळावर बहुमत मिळवता आले नव्हते. त्या निवडणुकीत भाजपाला 37 तर सहकारी पक्ष एसलेल्या एजेएसयू ला 5 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर झारखंड विकास मोर्चाच्या 6 आणि एका अपक्ष आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपाला बहुमताचा आकडा पार करता आला होता.
झारखंडमध्ये विधानसभेची पहिली निवडणूक 2005 मध्ये झाली होती. त्या निवडणुकीत भाजपा 30 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर झारखंड मुक्ती मोर्चाला 17 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपा आणि झारखंड मुक्ती मोर्चाला प्रत्येकी 18 जागा तर काँग्रेसला 14 आणि जेव्हीएमला 11 जागा मिळाल्या होत्या.