रांची - झारखंडमध्ये झामुमो, काँग्रेस आणि राजद आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर झामुमो चे नेते हेमंत सोरेन यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा कल स्पष्ट झाल्यानंतर हेमंत सोरेन यांनी झारखंडमधील जनतेचे आभार मानले आहेत. तसेच आजपासून राज्यात एक नवा अध्याय सुरू झाला असून, कुठल्याही जातीधर्माच्या, पंथाच्या, कुठलाही व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीचा अपेक्षाभंग होऊ दिला जाणार नाही, याचे मी आश्वासन देतो.
झारखंड मुक्ती मोर्चाचा विजय निश्चित झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हेमंत सोरेन म्हणाले की, स्पष्ट बहुमत देणाऱ्या राज्यातील जनतेचे मी आभार मानतो. माझ्यावर विश्वास दर्शवल्याबद्दल मी लालू प्रसाद यादव, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांचेही आभार मानतो. आजपासून राज्यात एक नवा अध्याय सुरू झाला आहे. राज्यात कुठल्याही जातीधर्माच्या, पंथाच्या, कुठलाही व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीचा अपेक्षाभंग होऊ दिला जाणार नाही, याचे मी आश्वासन देतो.
झारखंड विधानसभा निवडणुकीचा कल आता जवळपास स्पष्ट होत आला आहे. संपूर्ण निकाल अद्याप हाती आला नसला तरी आतापर्यंतच्या कलांमधून भाजपाचा पराभव होणार असल्याचे आणि सर्वात मोठी आघाडी ठरलेल्या झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद आघाडीचे राज्यात सरकार स्थापन होणार असल्याचे जळपास निश्चित झाले आहे. आतापर्यंत आलेल्या कलांनुसार झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल आघाडी 46 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा 25 जागांवर आघाडीवर आहे.