रांची - हरयाणात झालेली पिछेहाट आणि महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरूनही सरकार स्थापन करण्यात आलेल्या अपयशानंतर आता भाजपाला अजून एका राज्यात मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये झारखंडच्या सत्तेमधून भाजपा सरकारची एक्झिट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इंडिया टुडे आणि अॅक्सिस माय इंडिया यांच्या एक्झिट पोलमध्ये भाजपाला २२ ते ३२ तर झारखंड मुक्ती मोर्चा आणि मित्रपक्षांना ३८ ते ५० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इंडिया टुडे आणि अॅक्सिस माय इंडिया यांच्या एक्झिट पोलमध्ये २२ ते ३२, जेएमएम आणि मित्रपक्षांना ३८ ते ५०, जेव्हीएमला २ ते ४, एजेएसयूला ३ ते ५ आणि इतर पक्षांना ४ ते ७ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मतदानाच्या टक्केवारीचा अंदाज घेतल्यास भाजपाला ३४ टक्के, जेएमएम आणि मित्रपक्षांना ३७ टक्के मते मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आयएनएएस, सी व्होट आणि एबीपी न्यूजने मात्र झारखंडमध्ये त्रिशंकू विधानसभेचा अंदाज वर्तवला आहे. या एक्झिट पोलमधील अंदाजानुसार भाजपाला २८ ते ३६ जागा, झारखंड मुक्ती मोर्चा आणि मित्रपक्षांना ३१ ते ३९, जेव्हीएम १ ते४, एजेएसयू - १ ते ७ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.