रांची: झारखंडमध्ये पराभव पत्करावा लागल्यानं हिंदी पट्ट्यातलं आणखी एक महत्त्वाचं राज्य भाजपाच्या हातातून निसटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी झारखंडमधील सत्ता कायम राखण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. मात्र झारखंडच्या मतदारांनी झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या महाआघाडीच्या बाजूनं कौल देत भाजपाला जोरदार धक्का दिला. या पराभवामुळे अमित शहांनी वर्तवलेली शक्यता खरी ठरली आहे. आज तक या हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी बोलताना अमित शहांनी राज्यांमधील भाजपा नेतृत्त्वांवर भाष्य केलं होतं. 'जातीच्या आधारावर आम्ही नेतृत्त्वाची निवड करत नाही. आमच्या पक्षाला यामुळे नुकसानदेखील सहन करावं लागतं. मात्र जातीच्या निकषावर आम्ही कधीही अशा प्रकारचे निर्णय घेत नाही,' असं शहा म्हणाले होते. त्यांच्या विधानाला झारखंडसोबतच महाराष्ट्र, हरयाणातील मुख्यमंत्र्यांचा संदर्भ होता. आदिवासीबहुल झारखंडमध्ये बिगरआदिवासी रघुबर दास यांना पक्षानं मुख्यमंत्रिपद दिलं होतं. तर मराठ्यांचं वर्चस्व असलेल्या महाराष्ट्राची धुरा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आली होती. हरयाणात जाटांचं प्राबल्य असूनही बिगरजाट समुदायातील मनोहरलाल खट्टर यांची भाजपाकडून मुख्यमंत्रिपदी वर्णी लावण्यात आली.हरयाणा, महाराष्ट्र, झारखंडमध्ये स्थानिक बहुसंख्य समुदायातील नेत्यांना डावलून सामाजिकदृष्ट्या फारशी ताकद नसलेल्या समुदायातील नेत्यांना मुख्यमंत्रिपद देणं ही भाजपाची रणनीती आहे का, असा प्रश्न शहांना विचारण्यात आला. त्यावर लोकशाहीत जातीवादापेक्षा कामगिरीला महत्त्व देऊन नेतृत्त्वाची निवड करायला हवी. कोणीतरी त्या दृष्टीनं पावलं टाकायला हवीत. पंतप्रधान मोदींनी त्या दिशेनं काम सुरू केलं आहे. यामुळे कदाचित आम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं, अशी भीती अमित शहांनी व्यक्त केली होती. झारखंडच्या निवडणुकीत शहांचं हे विधान खरं ठरल्याचं दिसत आहे.
...अन् अमित शहांची मुख्यमंत्र्यांबद्दलची 'ती' भीती खरी ठरली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 12:54 PM