हेमंत सोरेन २८ ला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; पत्नी कल्पना यांनाही बनविणार मंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 08:03 AM2024-11-25T08:03:28+5:302024-11-25T08:03:56+5:30

सलग दुसऱ्यांदा शपथ घेणारे दुसरेच, काॅंगेसची उपमुख्यमंत्रिपदाची  मागणी सोरेन यांनी अमान्य केली आहे.

jharkhand election results: Hemant Soren will take oath as Chief Minister on 28; His wife Kalpana will also be made a minister | हेमंत सोरेन २८ ला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; पत्नी कल्पना यांनाही बनविणार मंत्री

हेमंत सोरेन २८ ला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; पत्नी कल्पना यांनाही बनविणार मंत्री

एस. पी. सिन्हा

रांची : झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांची झामुमोप्रणीत आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांनी रविवारी विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली. त्यानंतर सोरेन यांनी झारखंडचे राज्यपाल संतोषकुमार गंगवार यांना भेटून सरकार स्थापनेचा दावा केला. सोरेन यांचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी २८ नोव्हेंबरला होणार आहे. ते पत्नी कल्पना सोरेन यांना मंत्रमंडळात सहभागी करुन घेऊ शकतात. शपथविधीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल, राजदचे नेेते तेजस्वी यादव आदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. काॅंगेसची उपमुख्यमंत्रिपदाची  मागणी सोरेन यांनी अमान्य केली आहे.

अशी आहे हेमंत सोरेन यांची राजकीय कारकीर्द
हेमंत सोरेन झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे पुत्र आहेत. २००९ साली राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. मात्र, २०१० मध्ये या पदाचा राजीनामा देऊन ते तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री बनले. २०१३ साली हेमंत सोरेन त्या राज्याचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री झाले. त्यानंतर २०१९ साली काँग्रेस, राजदच्या पाठिंब्यावर ते पुन्हा झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले होते.

कल्पना सोरेन यांनी झामुमोला सावरले
ईडीने सोरेन यांना ३१ जानेवारी रोजी अटक केली होती. त्यावेळी रांची येथील ईडी कार्यालयात कल्पना सोरेन या आपल्या पतीला जेवण व औषधे देण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांची प्रसारमाध्यमांनी आवर्जून दखल घेतली होती. त्यानंतर २३ नोव्हेंबरला कल्पना रांची विमानतळाच्या प्रवेशद्वारातून बाहेर येत असताना हेमंत सोरेन यांनी त्यांचे छायाचित्र टिपले होते. आमच्या स्टार कॅम्पेनरचे स्वागत असो. या मजकुरासहित त्यांनी सदर छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित केले होते. कल्पना सोरेन या इंजिनियर असून त्यांनी एमबीएही केले आहे. सोरेन तुरुंगात असताना पक्षाला कल्पना यांनीच सावरले.

Web Title: jharkhand election results: Hemant Soren will take oath as Chief Minister on 28; His wife Kalpana will also be made a minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.