जमशेदपूर - 30 नोव्हेंबरपासून झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू झालं आहे. या टप्प्यात चत्रा, बिशुनपूर, लातेहार, गुमला, लोहरदगा, पनकी, माणिका, विश्रामपूर, हुसेनाबाद, डाल्टनगंज, छतरपूर, भवनाथपूर, गढवा या जागांसाठी मतदान होणार आहे. या जागांवर एकूण 189 उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
झारखंड पाच टप्प्यात मतदान होणार आहे, पहिला टप्पा 30 नोव्हेंबरला आणि शेवटचा टप्पा 20 डिसेंबरला असणार आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान होईल. पहिल्या टप्प्यात नक्षलग्रस्त भाग असल्याने मतदानाची वेळ दुपारी तीन वाजेपर्यंत ठेवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. येथे 37,83,055 मतदार नक्षलग्रस्त 6 जिल्ह्यातील 13 विधानसभा जागांवर 189 उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. भवनाथपूर मतदारसंघातून जास्तीत जास्त 28 उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
लातेहार आणि माणिका येथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी येथे नक्षलवादी हल्ला झाला होता. शनिवारी या ठिकाणी शांततेत मतदान होईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
८१ सदस्यांच्या झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपने ६५ जागा जिंकण्याचे लक्ष्य समोर ठेवले असले, तरी या पक्षाला बहुरंगी लढतींचा मुकाबला करावा लागत आहे. भाजपला सत्ता टिकवण्यासाठी ही महत्त्वपूर्ण लढत द्यायची असून, आता एकाच वेळी अनेकांशी दोन हात करावे लागणार आहेत. अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेशी (एजेएसयू) पक्षाचे मतभेद झालेले असून, ते दूर करण्यात अद्याप यश मिळालेले नाही. त्यातच एनडीएचे सहकारी पक्ष जदयू आणि लोजपा हे स्वबळावर लढत आहेत. महागठबंधनचे आव्हान वेगळेच आहे.
लोजपा अध्यक्ष चिराग पासवान यांनी स्वबळावर ५० जागा लढवण्याची घोषणा नुकतीच केल्याने भाजपला झटका बसला आहे. या निवडणुकीत युती करण्यासाठी आम्ही विचारले असता भाजपकडून काहीच उत्तर आले नव्हते. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. जदयूने सर्वप्रथम स्वबळावर लढण्याची घोषणा करून भाजपची कोंडी केली.