रांची - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एनआरसीबाबत मोठं विधान केलं आहे. २०२४ पर्यंत संपूर्ण देशात एनआरसी लागू करण्याची मर्यादा आखून देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील निवडणुकांपर्यत देशातील घुसखोरांना देशाच्या बाहेर काढलं जाईल. देशहितासाठी जे असेल त्यावर विरोधकांनी कितीही टीका केली तरी त्या योजना प्रत्यक्षात आणणार असल्याचंही स्पष्टीकरण अमित शहांनी दिलं.
अमित शहा यांनी सोमवारी संध्याकाळी झारखंडमधील चक्रधरपुर आणि बहारगोडा याठिकाणी निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, २०२४ पर्यंत देशभरात एनआरसी लागू केली जाणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी घुसखोरांची ओळख पटेल. त्यांना देशाबाहेर काढलं जाईल तसेच राहुल गांधी सांगतात की, त्यांना बाहेर काढू नका, ते कुठे जाणार, काय खाणार? मात्र तरीही २०२४ पर्यंत अवैधरित्या भारतात राहणाऱ्यांना बाहेर काढलं जाईल असं मी ग्वाही देतो असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत दहशतवादी, नक्षलवादी यांना उखडून टाकणे आणि अयोध्या येथे राम मंदिराचं भव्य निर्माण करणं हे झारखंड निवडणुकीच्या प्रचारात इतकं महत्त्वाचं आहे जितकं विकास आणि स्थानिक मुद्दे आहेत. राम मंदिराच्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टात अनेकदा काँग्रेसने बाधा आणली. काँग्रेस नेत्यांनी सांगितले की, राम मंदिर सुनावणीची गरज नाही. मात्र आमचं सरकार आल्यानंतर आम्ही सांगितले की, हा लोकांच्या भावनेचा विषय आहे. ही सुनावणी पुढे जायला हवी. त्यामुळे सुप्रीम कोर्टात राम मंदिराबाबत नियमित सुनावणी घेण्यात आली. त्याचा निकाल आज सर्व देशाच्या पुढे आला आहे असंही अमित शहांनी सांगितले.
दरम्यान, जेएमएम-काँग्रेस-आरजेडी आघाडीवर निशाणा साधताना अमित शहा म्हणाले की, भाजपा नेत्यांनी, राज्य सरकारने नक्षलवाद्यांना उखडून फेकून विकास केला त्याचं श्रेय त्यांना द्यायला हवं. ज्यावेळी काँग्रेस सत्तेत होती त्यावेळी झारखंड राज्याची मागणी केली जात होती. तेव्हा विद्यार्थ्यांवर गोळीबार आणि लाठीचार्ज करण्याचं काम काँग्रेसने केले असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केला.