झारखंड - नवी दिल्लीतील बुरारी येथील एकाच कुटुंबातील 11 जणांची सामूहिक आत्महत्या प्रकरण ताजे असताना झारखंडमध्येही एकाच कुटुंबातील 6 जणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील सहा जणांनी आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील सहा सदस्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आयुष्य संपवलं आहे. यातील 5 जणांनी गळफास घेतला तर एका व्यक्तीनं छतावरुन उडी मारुन आपली जीवनयात्रा संपवली आहे. मृतांमध्ये आई-वडील, मुलगा-मुलगी आणि नातवंडांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे राजधानी नवी दिल्लीतील बुरारी परिसरातील एकाच कुटुंबातील 11 जणांच्या सामूहिक आत्महत्या प्रकरणाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत.
(Burari Deaths : त्या 11 जणांच्या आत्महत्येमागे 5 आत्म्यांचा हात?)
बुरारी सामूहिक आत्महत्या प्रकरण
दिल्लीच्या बुरारी भागातील संतनगरमधील एकाच कुटुंबातील 11 जणांच्या सामूहिक आत्महत्येने एकच खळबळ उडाली होती. 1 जुलैला ही धक्कादायक घटना समोर आली होती. भाटिया कुटुंबातील 11 पैकी 10 सदस्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती तर वयोवृद्ध महिलेचा मृतदेह घरातील दुसऱ्या खोलीत आढळला होता. नारायणी देवी (77 वर्ष) यांच्यासोबत त्यांची मुलगी प्रतिभा (57 वर्ष) आणि त्यांची दोन मुलं भवनेश (50 वर्ष) आणि ललित (45 वर्ष) यांच्याशिवाय, भवनेश यांची पत्नी सविता (48 वर्ष) यांच्यासहीत त्यांची तीन मुलं मनिका (23 वर्ष), नीतू (25 वर्ष), धीरेंद्र (15 वर्ष) आणि ललित व त्याची पत्नी टीना (42 वर्ष) ,त्यांचा मुलगा दुष्यंत (15 वर्ष) आणि प्रतिभा यांची मुलगी प्रियंका (33 वर्ष) मृतावस्थेत आढळले होते.
भाटिया कुटुंबाच्या समोर राहणाऱ्या एका घराबाहेर सीसीटीव्ही आहे. या सीसीटीव्ही 30 जूनला घडलेल्या घटना कैद झाल्या आहेत. यामध्ये भाटिया कुटुंबातील दोघी घरात टेबल घेऊन जाताना दिसत आहेत. भाटिया कुटुंबानं आधी घरात टेबल आणले. त्यानंतर रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी समोरच्या दुकानातून वायर आणण्यात आल्या. ललित आणि भुवनेश भाटिया यांच्या मुलांनी समोरच्या दुकानातू वायर आणल्या. याच वायरचा वापर गळफास घेताना करण्यात आला. विशेष म्हणजे भाटिया कुटुंबाशिवाय घरात कोणीही नव्हतं. त्यांच्या घरात कोणीही जबरदस्ती घुसत असल्याचं सीसीटीव्हीत आढळून आलेलं नाही. याशिवाय घरातील कोणत्याही व्यक्तीच्या शरीरावर जबरदस्ती झाल्याच्या खुणा नाहीत. त्यामुळे या कुटुंबानं सामूहिक आत्महत्या केली, हे स्पष्ट झालं आहे. पोलिसांना घरात सापडलेल्या रजिस्टरमध्ये मृत्यू हा मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे, अशा संदर्भाचा मजकूर आहे. त्यामुळे मोक्षप्राप्तीसाठी या कुटुंबानं आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.