झारखंडमध्ये घडलेल्या एका घटनेची परिसरात चर्चा आहे. एका महिलेला पती २२ वर्षांनी अचानक जिवंत होऊन परतला. पती मृत पावल्याचं समजून विधवेचं जीवन जगणाऱ्या महिलेनं पतीला जिवंत पाहिले. पतीला बघून तिला धक्का बसला. विशेष म्हणजे महिलेचा पती साधूच्या वेशात होता. त्याच्या हातात सारंगी होती. तो भिक्षा गोळा करत होता. या घटनेची सध्या पंचक्रोशीत चर्चा आहे.
गढवा जिल्ह्यातल्या कांडी प्रखंडमधील सेमौरा गावात वास्तव्यास असलेल्या उदय यांनी २२ वर्षांपूर्वी घर सोडलं. कुटुंबियांनी त्यांचा बऱ्याच ठिकाणी शोध घेतला. मात्र ते सापडले नाहीत. अनेक महिने उलटले. उदय यांचा एखाद्या दुर्घटनेत मृत पावले असावेत असा कुटुंबियांचा समज झाला. त्यानंतर उद यांची पत्नी विधवा म्हणून जगू लागली.
२२ वर्षांनंतर पत्नीसमोर उदय येऊन उभे ठाकले. त्यांनी साधूचा वेष परिधान केला होता. त्यांच्या हातात सारंगी होती. पत्नी भिक्षा मागत ते गोरखनाथाचे भजन गाऊ लागले. उदय यांच्या पत्नीनं पतीला ओळखलं. २२ वर्षांनंतर पतीला पाहिल्यानं तिला रडू कोसळलं. मात्र उदय यांनी स्वत:ची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी काही ग्रामस्थदेखील तिथे पोहोचले. त्यांनीही उदय यांना ओळखलं.
शेवटी उदय यांनी पत्नीला आपली खरी ओळख सांगितली आणि भिक्षेची मागणी केली. पत्नीकडून भिक्षा न मिळाल्यास सिद्धी प्राप्त होणार नाही. मला माझ्या कर्तव्याचं पालन करू दे, असा आग्रह उदय यांनी धरला. जमलेल्या ग्रामस्थांनी उदय यांना कुटुंबासोबत राहण्याची विनंती केली. मात्र त्यांनी नकार दिला आणि गावाबाहेर असलेल्या एका महाविद्यालयात आश्रय घेतला. पत्नीकडून भिक्षा न मिळाल्यानं उदय सध्या परिसरातच भटकत आहेत.