झारखंड-
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेच्या निकालात एकसारख्या नावामुळे झारखंडच्या रामगढ जिल्ह्यातील दिव्या पांडे यांना मोठ्या गैरसमजुतीला सामोरं जावं लागलं. तिच्या कुटुंबीयांची समाजासमोर मोठी नाचक्की झाली.
नुकत्याच जाहीर झालेल्या UPSC सिव्हिल सर्व्हिसेसच्या निकालांमध्ये, जिल्ह्यातील चित्तरपूर ब्लॉकच्या राजराप्पा कॉलनी येथील रहिवासी असलेल्या दिव्या पांडेनं देशात ३२३ वा क्रमांक पटकावल्याचा दावा केला.
UPSC परीक्षा दिलेल्या मित्रांनी देखील दिव्याला फोनकरुन सांगितलं की तिनं UPSC मध्ये ३२३ वा क्रमांक पटकावला आहे. ही बातमी परिसरात वाऱ्याच्या वेगानं पसरली आणि दिव्याचं अभिनंदन करणाऱ्यांची झुंबड उडाली. सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेडचे सीएमडी, राजरप्पाचे जीएम, रामगडच्या जिल्हा आयुक्त माधवी मिश्रा यांच्यासह अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दिव्या पांडेचं अभिनंदन केलं.
सीसीएल अधिकाऱ्यांनी दिव्या पांडेच्या वडिलांचाही सन्मान केला. ते CCL मध्ये क्रेन ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. दुसरीकडे, दिव्या पांडे यूपीएससी उत्तीर्ण झाल्याच्या बातम्या इलेक्ट्रॉनिक मीडियापासून प्रिंट मीडियापर्यंत छापून आल्या. पण सत्य काही वेगळंच होतं. वास्तविक, UPSC मध्ये ३२३ वा क्रमांक मिळवणारी दिव्या पांडे नव्हे, तर ती तामिळनाडूची दिव्या पी. असल्याचं निष्पन्न झालं. नाव आणि आडनावातील घोळामुळे दिव्या पांडे व तिच्या कुटुंबीयांचा गैरसमज झाला होता.
त्याचं झालं असं की, दिव्या पांडेच्या कुटुंबीयांनी यूपीएससीच्या वेबसाइटवर निकाल पाहण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यादरम्यान इंटरनेट काम करत नव्हतं. म्हणून त्यांनी फक्त मित्रांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला होता. सत्य समोर येताच दिव्याचे कुटुंबीय निराश झाले.
"आमच्याकडून खूप मोठी चूक झाली, त्यामुळे आमची समाजात नाचक्की झाली. या चुकीबद्दल आम्ही दिलगीर आहोत", असं दिव्याच्या आई-वडिलांनी म्हटलं आहे. त्यांनी जिल्हा प्रशासन आणि सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेड (CCL) चीही माफी मागितली आहे.