नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील हावडा येथे शनिवारी झारखंडमधीलकाँग्रेसच्या तीन आमदारांना मोठ्या प्रमाणात रोख रकमेसह अटक केल्याप्रकरणी वाद अधिकच चिघळत चालला आहे. झारखंडमध्येकाँग्रेस अध्यक्ष राजेश ठाकूर यांनी आसाममध्ये झारखंड सरकार अस्थिर करण्याचा षडयंत्र रचले जात असल्याचा दावा केला आहे. तसेच, आजकाल आसाम हे सरकार पाडण्याचे केंद्रबिंदू बनले आहे, असे राजेश ठाकूर यांनी महाराष्ट्रातील राजकीय संकटाचा उल्लेख करत म्हटले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आता काँग्रेसच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.
काँग्रेसशी दीर्घकाळ संबंध असल्याने मी पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात असतो, असे हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे. पण झारखंड सरकार पाडण्याच्या कथित कटातील आपल्या भूमिकेचे आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत. हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, काँग्रेस नेते माझे जुने मित्र आहेत आणि सर्वांना हे माहित आहे. तसेच, ते म्हणाले की, काँग्रेस नेते जुने मित्र म्हणून माझ्याशी संपर्कात असतात. मी 20 वर्षांहून अधिक काळ त्या पक्षात होतो. इथे आल्यावर ते मला भेटतात. मी नवी दिल्लीत असताना त्यांना भेटतो. दरम्यान, हिमंता बिस्वा सरमा 2015 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झाले आहेत.
आमदार आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात?पश्चिम बंगालच्या हावडा येथे मोठ्या रकमेसह पकडलेले झारखंडमधील तीन आमदार आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. एका गुप्त माहितीच्या आधारे पश्चिम बंगाल पोलिसांनी शनिवारी रात्री काँग्रेसचे तीन आमदार इरफान अन्सारी, राजेश कछाप आणि नमन बिक्सल कांग्री यांना हावडा येथील रानीहाटीमध्ये राष्ट्रीय महामार्ग-16 वर अडवले आणि त्यांच्या वाहनातून मोठी रोकड जप्त करण्यात आली. रविवारी दुपारी पोलिसांनी त्यांना अटक केली.