वडील तुमचे देवच आहेत, कोणत्याही परिस्थितीत त्यांची देखभाल करावी लागेल - उच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 06:20 PM2024-01-12T18:20:19+5:302024-01-12T18:22:26+5:30
उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयावर सहमती दर्शवली.
झारखंडउच्च न्यायालयाने आपल्या एका निर्णयात मुलाला आपल्या वृद्ध वडिलांच्या देखभालीसाठी कोणत्याही परिस्थितीत पैसे द्यावे लागतील, असे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयावर सहमती दर्शवली. न्यायालयाच्या आदेशानुसार मुलाने वडिलांना देखभाल म्हणून दरमहा ३ हजार रूपये द्यायचे होते. या निर्णयाविरोधात मनोज नावाच्या व्यक्तीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायमूर्ती सुभाष चंद यांनी आपल्या निकालात म्हटले, "दोन्ही पक्षांनी सादर केलेले पुरावे सांगतात की, वडिलांकडे काही शेतजमीन आहे, तरीही ते शेती करण्यात असहाय्य आहेत. ते देखील त्यांच्या मोठ्या मुलावर अवलंबून आहेत, ज्याच्यासोबत ते राहतात. वडिलांनी त्यांचा लहान मुलगा मनोज साव याला संपूर्ण मालमत्तेत समान वाटा दिला आहे. पण, मनोजने त्याच्या वडिलांना १५ वर्षांहून अधिक काळ वडिलांचा सांभाळ केला नाही. वडील काही कमावत असले तरी आपल्या वृद्ध वडिलांना सांभाळणे हे पुत्राचे पवित्र कर्तव्य आहे", असे वृत्त लाइव्ह लॉने दिले.
उच्च न्यायालयाचा निर्वाळा
न्यायमूर्तींनी आदेश देताना महाभारताचा उल्लेख केला. हिंदू धर्मातील पालकांचे महत्त्व अधोरेखित करताना न्यायमूर्ती चंद यांनी आपल्या आदेशात लिहिले की, तुमचे आई-वडील ठीक, बलवान असतील तर तुम्हाला बलवान वाटेल. जर तेच दुःखी असतील तर तुम्हालाही दुःखी वाटेल. वडील तुमचे देव आहेत आणि आई तुमचे रूप आहे. ते बीज असून तुम्ही त्यांची वनस्पती आहे. त्यांच्यामध्ये जे काही चांगले किंवा वाईट आहे, त्याच्यातून तुमच्यात एक वृक्ष तयार होईल. त्यामुळे तुमच्या पालकांचे चांगले आणि वाईट दोन्ही गुण तुम्हाला वारसाने मिळतात. काही लोकांवर त्यांच्या जन्मापासून काही कर्जे असतात, ज्याची आपल्याला कोणत्याही किंमतीत परतफेड करावी लागते.
याआधी कौटुंबिक न्यायालयाने लहान मुलाला वडिलांच्या उदरनिर्वाहासाठी दरमहा ३ हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते. याविरोधात लहान मुलाने अपील केली होती. कौटुंबिक न्यायालयात याचिकाकर्त्या वडिलांनी आपल्या लहान मुलाविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १२५ अंतर्गत अर्ज दाखल केला होता. वडिलांनी अर्जात दावा केला होता की, त्यांना दोन मुलगे आहेत आणि लहान मुलगा भांडखोर आहे. तो त्यांच्याशी क्रूरपणे वागतो आणि मारहाण देखील करतो.
वडील तुमचे देवच आहेत - न्यायालय
दरम्यान, याचिकाकर्त्या वडिलांनी दावा केला होता की, २१ फेब्रुवारी १९९४ रोजी त्यांनी ३९८५ एकर जमीन त्यांच्या दोन मुलांमध्ये समान वाटून दिली होती. या याचिकेत म्हटले आहे की, मोठा मुलगा वडिलांना आर्थिक मदत करतो, तर लहान मुलगा वडिलांकडे दुर्लक्ष करतो आणि अनेकदा मारहाणही करतो. वडिलांनी दावा केला होता की, लहान मुलगा गावातील दुकानातून दरमहा सुमारे ५०,००० रुपये कमावतो, याशिवाय त्याला शेतीतून वार्षिक २ लाख रुपये मिळतात. वृद्ध वडिलांनी आपल्या लहान मुलाला दरमहा १०,००० रुपये देखभाल भत्ता देण्याची विनंती केली होती. त्यावर कौटुंबिक न्यायालयाने मुलाने वडिलांना दरमहा ३ हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते.
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद यांनी आपल्या निकालात महाभारताचा दाखला दिला. महाभारतात यक्षाने युधिष्ठिरला विचारले, "पृथ्वीपेक्षा जड काय आहे? स्वर्गापेक्षा उंच काय आहे? आणि गवतापेक्षा अगणित काय आहे?" यावर युधिष्ठिराने उत्तर दिले की, माता पृथ्वीपेक्षा जड आहे, पिता स्वर्गापेक्षा उंच आहे, मन हवेपेक्षा अधिक क्षणभंगुर आहे आणि आपले विचार गवतापेक्षा अधिक आहेत. यावर स्पष्टीकरण देत उच्च न्यायालयाने पुत्राला आपले पवित्र कर्तव्य बजावण्याचे आदेश दिले आहेत.