नवी दिल्ली - माणूस हा कायम विद्यार्थी असतो, असं म्हटलं जातं. या वाक्याचा प्रत्यय अनेकदा आपल्याला आलाही आहे. मात्र, यावेळी नक्कीच कौतुकास्पद वाटेल असा प्रत्यय झारखंडमधील उदाहरणातून येत आहे. झारखंडच्या हेमंत सोरेन सरकारमधील मंत्री जगरनाथ महतो यांनी 25 वर्षांनंतर कॉलेजला प्रवेश घेतला आहे. वयाच्या 52 व्या वर्षी जगरनाथ यांनी अकरावीच्या रेग्युलर वर्गातील प्रवेशासाठी अर्ज केलाय.
शिक्षणमंत्री असलेल्या महतो यांनी देवी महतो स्मारक इंटर महाविद्यालयातील कला शाखेत इयत्ता 11 वीच्या प्रवेशासाठी अर्ज केला आहे. राज्यशास्त्र हा विषय घेऊन ते आपले शिक्षण पूर्ण करणार आहेत. शिक्षणाला वयाची अट नसते, तर दुसरीकडे मी केवळ दहावी पास असून 10 वी पास आमदाराला मंत्री केल्याची टीकाही माझ्यावर सातत्याने करण्यात येत होती. या टीकाकारांना उत्तर देण्याचं काम मी केलंय, असे मंत्री महतो यांनी म्हटलंय. दहावीनंतर राजकारणात उडी घेतल्याने आपले शिक्षण अपूर्ण राहिल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली.
जगरनाथ महतो यांनी सोमवारी येथील महाविद्यालयात जाऊन प्रवेश प्रकिया पूर्ण केली. त्यासाठी, विद्यार्थ्यांप्रमाणे रांगेत उभे राहून आपला अर्ज दाखल केला. यावेळी, 1100 रुपये फी त्यांच्याकडून भरण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य दिनेश प्रसाद वर्णवाल हेही उपस्थित होते. मंत्री महतो यांनी वयाच्या 28 व्या वर्षी दहावी पास केली होती. त्यानंतर, शिक्षणात खंड पडल्यामुळे आता वयाच्या 53 व्या वर्षी त्यांनी अकरावीच्या वर्गात प्रवेश घेतला आहे.
महतो यांच्या अकरावी प्रवेशाची राज्यात चांगलीच चर्चा रंगली आहे, अनेकांनी त्यांच्या या विचाराचे कौतुक केलंय. तर काहींनी त्यांच्यावर टाकाही केली आहे. मात्र, मी विधानसभा आणि अकरावी या दोन्ही वर्गाची सांगड घालणार असल्याचे ते म्हणाले. मी शाळेत येऊन शिक्षण घेईल आणि विधानसभेत जाऊन लोकांच्या समस्याही सोडवणार असल्याचे महतो यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.