झारखंडमध्ये एका मुलीने थेट मुख्यमंत्र्यांकडे आपल्याला शिकण्याची इच्छा असून मदत करण्याची विनंती केली. एका कार्यक्रमादरम्यान मुलीने मुख्यमंत्र्यांसमोर आपली व्यथा मांडली. विशेष म्हणजे यानंतर पुढील 48 तासांत ती विद्यार्थिनी आणि तिच्या कुटुंबाला अनेक योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला. मुख्यमंत्र्यांनीही ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. "हा भाऊ तुझ्यासोबत आहे, तू खूप शिक" असं म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे शिक्षणासाठी मदत मागणारी ही विद्यार्थिनी गढवा येथील तिलदागमध्ये वास्तव्यास आहे. बेबी कुमारी असं या विद्यार्थिनीचं नाव असून, तिला सरकारी मदत देण्यात आली आहे. बेबी कुमारीला सावित्रीबाई फुले योजनेंतर्गत मदत करण्यात आला असून आणि तिच्या बहिणींना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. तसेच तिच्या आईला बकरी पाळण्यासाठी मुख्यमंत्री पशुधन विकास योजनेशी जोडण्यात आलं आहे.
बेबी कुमारीचे वडील इंद्रेश राम यांना मुख्यमंत्री रोजगार हमी योजनेंतर्गत पाच लाख रुपये देण्यात आले आहेत. याशिवाय बेबी कुमारीची बहिण रिमझिमला कस्तुरबा गांधी शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. सरकारी मदत मिळाल्यानंतर बेबी कुमारीने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्र्यांकडे मदत मागितल्यानंतर काही तासातच सरकारी योजनांचा लाभ मिळाला असल्याचं तिने म्हटलं आहे.
बेबी कुमारीने आपली मोठं होऊन शिक्षक होण्याची इच्छा असल्याचं म्हटलं आहे. गढवा येथील तिलदागमध्ये एका कार्यक्रमादरम्यान बेबी कुमारीने मुख्यमंत्र्यांकडे आपली शिकण्याची इच्छा असून, मदत करण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना बेबी कुमारी आणि तिच्या कुटुंबाला वेगवेगळ्या योजनांशी जोडण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अवघ्या 48 तासांतच कुटुंबाला मदत करण्यात आली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"