धनबाद : झारखंडमध्ये आज(शुक्रवारी) सकाळी अवैध कोळसा खाण कोसळल्याची माहिती मिळाली आहे. खाण कोसळल्याने तिथे काम करणाऱ्या तीन मजुरांचा मृत्यू असून, अनेक मजूर खाणीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. मीडियाशी बोलताना धनबादचे एसएसपी संजीव कुमार यांनी सांगितले की, खाणीचा जो भाग कोसळला आहे, तो भाग बीसीसीएल (भारत कुकिंग कोल लिमिटेड) अंतर्गत येतो.
संजीव कुमार यांनी पुढे सांगितले की, या दुर्घटनेत 25 वर्षीय तरुण, एक महिला आणि एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांचे मृतदेह बाहेर काढून तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जखमींबाबत बीसीसीएलच्या अहवालाची वाट पाहत आहोत. या प्रकरणासाठी जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.
धनबादमध्ये दररोज मोठ्या संख्येने लोक अवैध खाणकाम करून कोळसा काढतात. कोळशाच्या बेकायदेशीर उत्खननादरम्यान अनेकांना आपला जीवही गमवावा लागतो. मात्र पोलिस केसच्या भीतीने कुटुंबीय गप्प बसतात. अवैध खाणकामाच्या या खेळात स्थानिक पोलिस आणि राजकारण्यांचीही मिलीभगत आहे. अनेक वेळा अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना कोळशाच्या ढिगाऱ्यात गाडले जाते.