- किरण अग्रवालरांची - महाराष्ट्रात बारामतीत नणंद-भावजयीमध्ये होऊ घातलेली लढत चर्चेत आहे. तर, झारखंडमध्ये दीर-भावजयीत सामना होऊ घातला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेते शिबू सोरेन यांची राजकीय प्रतिष्ठा पणास लागण्याची चिन्हे आहेत.
झारखंड राज्याच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका राहिलेले माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या मोठ्या सुनबाई सीता सोरेन यांनी भाजपात पक्षप्रवेश केला आहे. दीर हेमंत सोरेन यांना ‘ईडी’ने अटक केल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाने हेमंत यांच्या पत्नी कल्पना यांना आता पुढे आणल्याचा संताप सीता यांच्या मनात आहे. सीता यांचे पती व शिबू साेरेन यांचे ज्येष्ठ पुत्र दिवंगत दुर्गा सोरेन हयात असेपर्यंत त्यांचा दबदबा होता. त्यांच्या निधनानंतर सीता राजकारणात उतरल्या. त्या तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या असून, आता लोकसभेसाठी ‘भाजप’तर्फे उमेदवारी करीत आहेत.
कुटुंब रंगलेय राजकारणात...- ज्येष्ठ नेते शिबू सोरेन यांचे पुत्र माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन सध्या अटकेत असले तरी ते कारागृहातून लोकसभेची निवडणूक लढवण्याची चिन्हे आहेत.- त्यांच्यासमोर त्यांचीच भावजयी सीता सोरेन यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. हेमंत यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांची गांडेय विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी निश्चित मानली जात आहे.- हेमंत यांचे बंधू बसंत सोरेन राज्य मंत्रिमंडळात मंत्री आहेत, तर हेमंत यांच्या भगिनी अंजनी सोरेन यांना ओडिशातील मयूरभंज मतदारसंघातून ‘झामुमो’ने उमेदवारी दिली आहे. अवघे सोरेन कुटुंब राजकारणात रंगले आहे.
शिबू यांच्यासमोर पेचदुमका लोकसभा मतदारसंघातून ‘झामुमो’तर्फे कन्या जयश्री हिला उमेदवारी मिळावी, अशी सीता सोरेन यांची इच्छा होती, परंतु दीर हेमंत सोरेन हेच त्या जागी पक्षातर्फे लढणार असल्याच्या वार्ता पुढे आल्याने सीता भाजपात गेल्या.झारखंडच्या राजकारणात प्रथमच सोरेन परिवारातील सदस्य आमने-सामने उभे ठाकून तेथे दीर-भावजयीत लढत होण्याची चिन्हे आहेत.हेमंत यांना ‘ईडी’च्या अटकेत साठ दिवस झाल्याने व चार्जशीट दाखल होत असल्याने ते खरेच कारागृहातून निवडणूक लढतील का, असा प्रश्नही केला जात आहे. मुलगा की सुनबाई, हा प्रश्न मात्र शिबू सोरेन यांच्यासाठी अडचणीचाच ठरेल.