जमशेदपूर - आज व्हॅलेंटाइन डे असल्या कारणाने अनेकजण आपल्या प्रेमाच्या गोष्टी, फोटो शेअर करत असतील. पण जमशेदपूरमध्ये खरं प्रेम म्हणजे काय सांगणारी एक घटना घडली आहे. आपल्या हरवलेल्या पत्नीचा शोध घेण्यासाठी एका व्यक्तीने सायकलवरुन 24 दिवसांत चक्क 600 किमी प्रवास केल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे. 42 वर्षीय मनोहर नाईक कामगार आहेत. आपल्या पत्नीचा शोध घेण्यासाठी त्यांनी केलेली ही धडपड अखेर यशस्वी ठरली आणि पश्चिम बंगालमधील खारंगपूर येथे त्यांची पत्नी सापडली.
आपल्या पत्नीच्या शोधात मनोहर नाईक यांनी बलीगोडा गावातून प्रवास सुरु केला. ते रोज 25 किमी प्रवास करत होते. 24 दिवसांत ते 65 गावांमधून फिरले. 14 जानेवारीला त्यांची पत्नी अचानक गायब झाली होती. मकर संक्रांती साजरी करण्यासाठी त्या आपल्या माहेरी गेल्या होत्या.
'जेव्हा दोन दिवसानंतरही ती घरी परतली नाही तेव्हा मी पोलीस ठाण्यात जाऊन बेपत्ता झाल्याची तक्रार केली', अशी माहिती मनोहर यांनी दिली आहे. मनोहर ओडिशामध्ये रोजंदारीवर काम करतात. पोलिसांना कोणतीही माहिती मिळत नसल्याचं पाहिल्यानंतर मनोहर यांनी आपली पत्नी अनिताचा शोध घेण्यासाठी संपुर्ण राज्यभरात प्रवास करायचं ठरवलं. मनोहर यांची पत्नी अनिताची मानसिक स्थिती योग्य नसून, त्यांना व्यवस्थित बोलताही येत नाही.
'मी माझी खराब झालेली सायकल दुरुस्त करुन घेतली आणि एका गावातून दुस-या गावात प्रवास सुरु केली. किती अंतर मला कापायचं आहे याची काहाही कल्पना नव्हती', असंही मनोहर यांनी सांगितलं आहे. जेव्हा शोध घेऊनही पत्नी सापडत नव्हती तेव्हा मात्र मनोहर यांनी वृत्तपत्रात बेपत्ता झाल्याची जाहिरात देण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आणि काही लोकांनी आपण या महिलेला खारंगपूर येथे रस्त्याशेजारी बसलेलं पहायला मिळाल्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी लगेचच त्यांना आपल्या ताब्यात घेतलं. मनोहर यांनाही पोलिसांनी कळवलं आणि अखेर 10 फेब्रुवारीला त्यांची ताटातूट संपली आणि भेट झाली.