रांची: चोरीच्या संशयावरुन जमावानं केलेल्या जबर मारहाणीत एका मुस्लिम तरुणाचा मृत्यू झाला. झारखंडमधील खारसावन जिल्ह्यात हा प्रकार घडला. या तरुणाला कित्येक तास मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. मात्र गंभीर दुखापत झाल्यानं त्याचा मृत्यू झाला. या तरुणाला झालेल्या मारहाणीचे व्हिडीओ समोर आले आहेत. त्यात त्याला जय श्रीराम म्हणण्यास सांगितलं जात आहे. 'इंडिया टुडे'नं हे वृत्त दिलं आहे. जमावानं केलेल्या मारहाणीत 24 वर्षीय तबरेज अन्सारी गंभीर जखमी झाला. 22 जूनला त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तबरेजला लाकडी काठीनं मारहाण केली जात असल्याचं दिसत आहे. याशिवाय त्याला 'जय श्रीराम' आणि 'जय हनुमान' म्हणण्यासदेखील सांगितलं जात आहे. 18 जूनला हा संपूर्ण प्रकार घडला. त्यानंतर तबरेजला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं होतं. प्रकृती खालावल्यानं 22 जूनला त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याचा मृत्यू झाला. तबरेजच्या मृत्यूनंतर पप्पू मंडलला अटक करण्यात आली. तर अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.तबरेज पुण्यात वेल्डर म्हणून काम करत होता. कुटुंबासोबत ईद साजरी करण्यासाठी तो झारखंडला गेला होता. येत्या काही दिवसात त्याचा निकाह होणार होता. 18 जूनला तो दोन व्यक्तींसोबत जमशेदपूरहून निघाला. या दोन व्यक्ती कुठे घेऊन चालल्या आहेत, याची माहिती तबरेजला नव्हती, असं सामाजिक कार्यकर्ते औरंगजेब अन्सारी यांनी 'हफपोस्ट इंडिया'ला सांगितलं. तबरेजची दिशाभूल करुन दोन व्यक्ती त्याला घेऊन गेल्या, असा दावादेखील त्यांनी केला. त्या दोन व्यक्ती अचानक पळून गेल्या आणि जमावानं तबरेजला चोरीच्या आरोपावरुन जबर मारहाण केली, अशी माहिती अन्सारींनी दिली.