झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 07:18 PM2024-05-15T19:18:58+5:302024-05-15T19:20:52+5:30
Alamgir Alam Arrested : आज ईडीने आलमगीर आलम यांना चौकशीसाठी बोलावले होते.
झारखंडचे विकास मंत्री आणि काँग्रेस नेते आलमगीर आलम यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी आलमगीर आलम यांच्या सचिवाच्या नोकराच्या घरातून कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली होती. याप्रकरणी आज ईडीने आलमगीर आलम यांना चौकशीसाठी बोलावले होते. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, आलमगीर आलम यांनी ईडीच्या चौकशीत सहकार्य केले नाही. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली.
आलमगीर आलम यांच्या सचिवाच्या नोकराच्या घरातून ३७ कोटींहून अधिक रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. या संदर्भात ईडीकडून आलमगीर आलम यांची चौकशी सुरु होती. यापूर्वी मंगळवारी ईडीने आलमगीर आलम यांची १० तास चौकशी केली होती. मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) जबाब नोंदवण्यासाठी आलम (७०) यांना मंगळवारी रांची येथील ईडी झोन कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते.
दरम्यान, गेल्या काही दिवासांपूर्वी ईडीच्या या छाप्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो समोर आले होते. यामध्ये केंद्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी बॅगेतून नोटांचे बंडल काढताना दिसत होते. यानंतर रोख रक्कम मोजण्यासाठी नोट मोजण्याचं यंत्र बसवण्यात आले होते. जप्त करण्यात आलेल्या रक्कमेमध्ये सर्वाधिक पाचशे रुपयांच्या नोटा होत्या. याशिवाय, ईडीच्या अधिकाऱ्यांनी आलमगीर आलम यांच्या फ्लॅटमधून काही दागिनेही जप्त केले होते.