रांची : रांची येथे मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेवर नवजात अर्भकांची विक्री केल्याचा आरोप करण्यात आला आहे. झारखंड सरकारने या आरोपांची दखल घेत याप्रकरणाची अधिक चौकशी सुरु केली आहे. तसेच पोलिसांनी याप्रकरणी दोन नन्ससह एका महिला कर्मचाऱ्याला अटक केली आहे.
कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी श्यामानंद मंडल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या कर्मचाऱ्यांनी एका जोडप्याला मूल विकलं होतं. पण काही दिवसांनी संस्थेने हे विकलेलं मूल पुन्हा आपल्या ताब्यात घेतलं. मात्र या मुलासाठी जोडप्याने तब्बल 1.20 लाख रुपये मोजले होते. त्यामुळेच फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी रांचीच्या बाल कल्याण समितीकडे मदर तेरेसांच्या संस्थेविरोधात तक्रार दाखल केली आणि हे धक्कादायक प्रकरण समोर आलं.