नवी दिल्ली, दि.26- व्हॉट्सअॅप व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गायीबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे एका तरूणाला अटक करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गायीविरोधात आक्षेपार्ह भाषेचा उपयोग करून व्हिडीओ तयार केल्याप्रकरणी झारखंडमधील हजारीबाग पोलिसांनी एका २५ वर्षाच्या तरूणाला अटक केली आहे. त्या तरूणाने तयार केलला व्हिडीओ सध्या व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला होता. मोहम्मद आरिफ असं अटक करण्यात आलेल्या तरूणाचं नाव आहे. त्याला सोमवारी अटक करण्यात आली असून मंगळवारी त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, हजारीबागचे पोलीस अधीक्षक अनुप बिरथारे यांनी ही माहिती दिली आहे. हिंदुस्तान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.
जून ते जुलै या एका महिन्यात झालेलं हे दुसरं प्रकरण आहे. दोन्ही घटनांमध्ये मुस्लिम व्यक्तीने पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्यामुळे त्यांना तुरूंगात पाठवण्यात आलं आहे. याआधी २३ जून रोजी साहिबगंज पोलिसांनी २० वर्षीय समीर अन्सारीला अटक केली होती. त्याने एका व्हिडीओत मोदी आणि भारताविरोधात घोषणाबाजी केल्यामुळे त्या तरूणाला अटक करण्यात आली होती. समीर अन्सारीने तयार केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. विेशेष म्हणजे झारखंडमध्ये भाजपची सत्ता असल्याने मोदींविरोधात झालेली आक्षेपार्ह वक्तव्य चर्चेचा विषय होतो आहे.
आरिफ हा मोटारसायकल मॅकेनिक असून त्याला रांचीपासून ९५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हजारीबाग इथून अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. व्हिडीओतील चिथावणीखोर वक्तव्यं काढून टाकण्यात आली आहेत. सोशल मीडियावर जातीयवादी हिंसाचार पसरवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडे दुर्लक्ष केलं जाणार नसून त्यांना कठोर शिक्षा दिली जाइल, असं पोलीस अधीक्षक बिरथारे यांनी म्हंटलं आहे.
या व्हिडीओमध्ये आरिफने गायींचा अपमान केला असून सर्वांसमोर गाय कापण्याची धमकी दिली होती. त्याने स्वत: हा व्हिडीओ बनवला होता आणि व्हॉट्सअपवर व्हायरल केला होता. सोशल मीडियावर सामाजिक तेढ निर्माण करणारे व्हिडिओ पसरवल्याच्या आरोपाखाली हजारीबागमधूनच यावर्षी आतापर्यंत जवळपास ११ जणांना तुरूंगात टाकण्यात आलं आहे. गेल्या एक महिन्यात झारखंडमध्ये किमान ५ जातीयवादी दंगली घडल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच झारखंड सरकारने राज्यातील सर्व २४ जिल्ह्यांमध्ये जातीयवादी संवेदनशील गोष्टी सोशल मीडियावर टाकण्यास बंदी घातली आहे.