रांची:झारखंडमधूनपोलिसांच्या थरारक कामगिरीचे प्रकरण समोर आले आहे. झारखंडमधील एका कोळसा खाणीत केबल चोरण्यासाठी 25 सशस्त्र दरडेखोर घुसले. ही माहिती मिळाल्यापासून पोलिसांनी खाणीबाहेर घेराव घातला असून, पकडले जाण्याच्या भीतीने सशस्त्र चोरटे बाहेर येण्याचे धाडस करत नाहीयेत. गेल्या 36 तासांपासून खाणीबाहेर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे.
रविवारी रात्री खाणीत प्रवेश केला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री चोरट्यांची एक सशस्त्र टोळी धनबाद जिल्ह्यातील भाग्यलखी कोळसा खाणीत केबल चोरण्यासाठी घुसली. एवढ्या मोठ्या प्रमाणात हल्लेखोरांची माहिती मिळताच पोलिस आणि पॅरा मिलिट्री फोर्सचे जवान घटनास्थळी पोहोचले. पोलिस आल्याने घाबरलेल्या हल्लेखोरांनी पोलिसांवर बॉम्ब फेकले आणि गोळीबारही केला. या हल्ल्यात इन्स्पेक्टर अवध बिहारी महतो जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही गोळीबार केला. त्यात हल्लेखोरांचे काही नुकसान झाले की नाही, याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही.
खाणीबाहेर पोलिस तैनातरविवारपासून आजपर्यंत ही स्थिती कायम आहे. मोठ्या संख्येने पोलिस खाणीबाहेर नाकाबंदी करून उभे आहेत. तर, पकडले जाण्याच्या भीतीने दरोडेखोरही खाणीत लपून बसले आहेत. त्या खाणीत अंधार आहे, शिवाय अन्न-पाण्याची सोय नाही. या गुन्हेगारांना बाहेर काढणे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे. सीआयएसएफचे जवान सतत खाणीतून हल्लेखोरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र दुपारी 3 वाजेपर्यंत त्यांना यश मिळू शकले नाही.
दरोडेखोर शरण येण्यास तयार नाहीत
धनबादचे एसपी रिस्मा रामसन यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी घटनेचा आढावा घेतला. 25 ते 30 गुन्हेगार आत असून त्यांच्याकडे शस्त्रेही असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस पथक आत गेले होते पण परत आले आहे. गुन्हेगार बाहेर न आल्यास सुरक्षेसह पुन्हा आत जातील. सध्या ध्वनिक्षेपकावरुन गुन्हेगारांना बाहेर येण्यास सांगितले जात आहे, मात्र पलीकडून प्रतिसाद येत नाही. खाणीत लपून बसलेल्या चोरट्यांना खाद्यपदार्थ पाठवण्याचा प्रयत्नही पोलिसांनी केला, मात्र ते खाणीत कुठे लपले आहेत, याची माहिती मिळत नाही. गोळीबाराच्या भीतीने पोलिसांनी मीडिया कर्मचाऱ्यांना खाणीजवळ जाण्यापासून रोखले आहे.