बिहारमध्येही 'झारखंड पॅटर्न'? काँग्रेस दुय्यम भूमिका स्वीकारण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 02:20 AM2020-01-03T02:20:35+5:302020-01-03T07:05:03+5:30

राजदला अधिक महत्त्व देण्यास राजी

Jharkhand pattern in Bihar too? Congress is preparing to accept a secondary role | बिहारमध्येही 'झारखंड पॅटर्न'? काँग्रेस दुय्यम भूमिका स्वीकारण्याच्या तयारीत

बिहारमध्येही 'झारखंड पॅटर्न'? काँग्रेस दुय्यम भूमिका स्वीकारण्याच्या तयारीत

Next

पाटणा : झारखंडमध्ये भाजपचा पराभव केल्यानंतर तेथे अवलंबिलेली रणनीती काँग्रेस बिहार विधानसभा निवडणुकांमध्येही वापरण्याची शक्यता आहे. सत्ताधारी जनता दल (यू), भाजप युतीच्या विरोधात लढताना राष्ट्रीय जनता दल (राजद) या घटक पक्षाला काँग्रेस अधिक महत्त्व देण्याची शक्यता आहे.

झारखंड मुक्ती मोर्चाशी (झामुमो) आघाडी करताना काँग्रेसने काहीशी दुय्यम भूमिका स्वीकारली होती. तेथील विधानसभा निवडणुकीत आघाडीचा विजय झाल्यानंतर झामुमोचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन हेच मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा काँग्रेसने केली. हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली झामुमो, काँग्रेस, राजदने झारखंडमध्ये सरकार स्थापन केले.

बिहारमधील सध्याच्या विधानसभेची मुदत यावर्षी २९ नोव्हेंबरला संपत आहे. काँग्रेसने दूरदृष्टीने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. राजदला अधिक महत्त्व देण्यास, तसेच त्या पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांना आघाडीतर्फे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यास काँग्रेस राजी असल्याचे कळते. काँग्रेस, राजदच्या आघाडीत उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोकसमता पक्ष (आरएलएसपी) तसेच जीतनराम माझी यांचा हिंदुस्थानी अवाम मोर्चा, विकासशील इन्सान पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट-लेनिन) हे पक्षही सामील होण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये काँग्रेसप्रणीत आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपासाठी एप्रिल-मेच्या सुमारास चर्चा होईल; पण आघाडीने बिहार विधानसभा निवडणुकांची पूर्वतयारी आतापासूनच सुरू केली आहे, असे काँग्रेसचे बिहारचे प्रभारी शक्तिसिंह गोहील यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

Web Title: Jharkhand pattern in Bihar too? Congress is preparing to accept a secondary role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.