रायपूर : झारखंड सरकारने घोडेबाजाराच्या शक्यतेमुळे आपल्या आमदारांना रायपूरमध्ये पाठवले आहे, असे छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी बुधवारी म्हटले आहे. झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील महागठबंधन सरकारचे ३२ आमदार मंगळवारी रायपूरमध्ये दाखल झाले असून, येथे एका रिसॉर्टमध्ये वास्तव्यास आहेत.
बघेल यांनी हिमाचल प्रदेशकडे रवाना होण्यापूर्वी पत्रकारांना सांगितले की, निवडणूक आयोगाने पत्र दिले आहे व त्याला एक आठवडा उलटला आहे. तरीही राजभवनाने याबाबत काहीही निवेदन दिलेले नाही. त्यावरून आत काही तरी शिजत आहे, असा याचा अर्थ काढला जात आहे. अशा स्थितीत झामुमो व काँग्रेसने आपले आमदार सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ते छत्तीसगढमध्ये आले आहेत. ३२ आमदारांना रायपूरमध्ये हलविण्यात आले आहे, त्यात काँग्रेसच्या १७ आमदारांचा समावेश आहे.
तेव्हा का मौन बाळगले?मंगळवारी झारखंडचे आमदार रायपूरमध्ये दाखल झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांनी ट्वीट करून मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. यावर बघेल म्हणाले की, जेव्हा मध्यप्रदेश, राजस्थानच्या आमदारांना तसेच महाराष्ट्राच्या आमदारांना नेण्यात आले होते, तेव्हा त्यांनी का मौन बाळगले होते. त्यावेळी त्यांनी बोलायला पाहिजे होते. हे तर आमच्या पक्षाचे लोक आहेत. यात त्यांना त्रास होण्याचे काहीही कारण नाही.