झारखंडमध्ये ऑपरेशन लोटस? चंपाई सोरेन यांच्यासह JMM चे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 06:44 PM2024-08-16T18:44:34+5:302024-08-16T18:44:56+5:30

अचानक मुख्यमंत्रिपदावरुन हटवल्यामुळे चंपाई सोरेन नाराज असल्याचे वृत्त आहे.

Jharkhand Politics, Many JMM MLAs including Champai Soren are in touch with BJP | झारखंडमध्ये ऑपरेशन लोटस? चंपाई सोरेन यांच्यासह JMM चे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात

झारखंडमध्ये ऑपरेशन लोटस? चंपाई सोरेन यांच्यासह JMM चे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात

JMM Jharkhand : झारखंडमधील सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन आणि माजी आमदार लोबिन हेमब्रम यांच्यासह पक्षाचे आणखी काही आमदार मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. येत्या एक-दोन दिवसांत भाजपच्या काही बड्या नेत्यांची भेट घेऊन चंपाई सोरेन दिल्लीतच भाजपचे सदस्यत्व घेऊ शकतात. विशेष म्हणजे, या वर्षाच्या अखेरीस राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.

हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात जावे लागले होते, अशा वेळी चंपाई सोरेन यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्यात आले. पाच महिने तुरुंगात राहिल्यानंतर 28 जून रोजी हेमंत सोरेन यांची सुटका झाली. यानंतर त्यांनी चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवले अन् राज्याची सूत्रे हाती घेतली. दरम्यान, मुख्यमंत्रिपदावरुन हटवल्यामुळे चंपाई सोरेन नाराज असल्याचे वृत्त आहे. 

सातवेळा आमदार, पक्षाचे ज्येष्ठ नेते
चंपाई सोरेन 2 फेब्रुवारी 2024 ते 3 जुलै 2024 पर्यंत झारखंडचे मुख्यमंत्री होते. चंपाई सोरेन यांची गणना झामुमोच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये केली जाते. ते सात वेळा आमदार आहेत. 1991 मध्ये ते सरायकेला मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. 2005 पासून ते सेराईकेला विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. हेमंत सोरेन यांनी 2019 मध्ये चंपाई सोरेन यांना कॅबिनेट मंत्री केले होते. त्यांना वाहतूक, अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय कल्याण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती.

वर्षाच्या अखेरीस विधानसभेच्या निवडणुका 
झारखंडमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्यात विधानसभेच्या एकूण 82 जागा आहेत. जेएमएम सध्याच्या विधानसभेत 27 आमदारांसह सर्वात मोठा पक्ष आहे. त्याने काँग्रेस, सीपीआय-एमएल आणि आरजेडीसोबत आघाडी करुन सरकार स्थापन केले आहे. राज्यात काँग्रेसकडे 18, सीपीआय-एमएल आणि आरजेडीकडे प्रत्येकी 1 आमदार आहे. झारखंडमध्ये भाजप विरोधी पक्षात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 24 जागा मिळाल्या होत्या. इतर विरोधी पक्षांमध्ये ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन 3, राष्ट्रवादी काँग्रेस 1 आणि दोन अपक्ष आमदारांचा समावेश आहे, तर चार जागा काही कारणास्तव रिक्त आहेत.

Web Title: Jharkhand Politics, Many JMM MLAs including Champai Soren are in touch with BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.