Jharkhand Railway accident near Jhamtara: झारखंड मधील जामतारा येथून मोठी बातमी समोर आली आहे. जामतारा आणि विद्यासागर स्थानकांदरम्यान अंदाजे १२ लोकांना ट्रेनने धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे आणि आतापर्यंत २ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अंधारामुळे किती जणांना जीव गमवावा लागला याचा नेमका अंदाज अद्याप समोर आलेला नाही. अंधारामुळे बचावकार्यालाही विलंब होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरू-यशवंतपूर एक्स्प्रेस डाऊन मार्गावरून जात होती. दरम्यान, लाईनच्या बाजूला टाकलेल्या गिट्टीची धूळ उडत होती, मात्र धूळ पाहून गाडीला आग लागल्याचा व त्यातून धूर निघत असल्याचा संशय चालकाला आला. त्यामुळे रेल्वे थांबताच प्रवासीही उतरले. या दरम्यान, अप मार्गावर जाणाऱ्या ईएमयू ट्रेनची धडक बसून काही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
पंतप्रधान मोदींनीही रेल्वेअपघातावर शोक व्यक्त केला आहे. झारखंडमधील जामतारा येथे झालेल्या अपघाताचे वृत्त ऐकून दुःख झाल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याबद्दल माझ्या सहवेदना. जखमी लोक लवकर बरे व्हावेत अशी माझी इच्छा आहे, असेही ते म्हणाले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडूनही शोक व्यक्त
अपघातावर रेल्वे प्रशासन काय म्हणाले?
याबाबत रेल्वेचे म्हणणे आले आहे. रेल्वेकडून आग लागल्याची कोणतीही शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. अलार्म चेन खेचल्यामुळे ट्रेन क्रमांक 12254 थांबल्याचे सांगण्यात आले. तेवढ्यात दोन लोक रुळावर आले आणि त्यांना मेमू ट्रेनने चिरडले. रेल्वेच्या म्हणण्यानुसार आगीची कोणतीही घटना घडली नाही. ठार झालेले हे ट्रेनचे प्रवासी नव्हते, असे रेल्वेचे म्हणणे आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
याप्रकरणी जामतारा उपायुक्तांचे म्हणणे आले आहे. ते म्हणाले, 'जामतारा येथील कालाझरिया रेल्वे स्थानकावर एक ट्रेन प्रवाशांच्या अंगावर धावली. काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. किती लोकांचा जीव गेला हे नंतर निश्चित होईल. वैद्यकीय पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.