रांची: झारखंडमधूनअपहरणाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माजी क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी (ms dhoni) च्या नावाचे आमिष दाखवून दीड वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करण्यात आले आहे. गुन्हेगारांच्या या नव्या पद्धतीमुळे पोलिसांनाही मोठा धक्का बसला आहे. जाणून घेऊ संपूर्ण प्रकरण.
ही घटना झारखंडची राजधानी रांचीची आहे. जगन्नाथपूर येथील रहिवासी मधु देवी आपल्या दोन मुलांसह रांचीच्या हिन्नू येथील एका स्टॉलवरुन काहीतरी खरेदी करत होत्या. तेवढ्यात एक दुचाकीस्वार व्यक्ती महिलेसोबत तिथे आला आणि धोनी गरीबांना 5 हजार रुपये आणि घरं वाटतोय, असे सांगितले. मधु देवी त्या व्यक्तीच्या बोलण्यात अडकल्या आणि लोभापोटी त्या व्यक्तीच्या गाडीवर बसून गेल्या.
त्या दुचाकीस्वाराने मधूला हरमूजवळील वीज कार्यालयाजवळ सोडले आणि त्यांच्या हातून दीड वर्षीय मुलाला घेऊन पसार झाले. मधुने धावत दोघांनाही पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत दोघेही मुलासह पळून गेले. यानंतर पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळाजवळ लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात येत आहे.
तीन दिवस उलटूनही पोलिसांचे हात रिकामेया घटनेला कारण तीन दिवस उलटून गेले तरी पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. आतापर्यंत अपहरणकर्त्यांचा कोणताही सुगावा पोलिसांना मिळालेला नाही. रांचीचे एसएसपी चंदन सिन्हा यांनी सांगितले की, पोलिस या प्रकरणाचा सर्व संभाव्य पैलूंवने तपास करत आहेत. तक्रारदार महिलाही वेगवेगळी माहिती देत आहे, त्यामुळे त्या बाजूनेही पोलीस तपास करत आहेत.