नवी दिल्ली - झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीतील खर्चाचा हिशेब न दिल्यानं निवडणूक आयोगानं मधू कोडा यांच्यावर निवडणूक लढवण्यास तीन वर्षांपर्यंत बंदी घातली आहे. मधू कोडा यांनी झारखंडचे पाचवे मुख्यमंत्री म्हणून 2006ला खुर्ची सांभाळली होती. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात ते अपक्ष होते.कोडा यांनी स्वतःच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ऑल झारखंड स्टुडंट युनियनच्या स्वरूपातून केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही कोडा यांची जवळीक होती. बाबूलाल मरांडा यांच्या नेतृत्वात झालेल्या सरकारमध्ये ते पंचायत राज मंत्री होते. 2003मध्ये अर्जुन मुंडा यांच्या मंत्रिमंडळातही त्यांनी याच विभागाचा कार्यभार सांभाळला होता. 2005च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून तिकीट न मिळाल्यानं त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती व ते जिंकलेसुद्धा होते.कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यानं भाजपाच्या नेतृत्वात अर्जुन मुंडा सरकारला त्यांनी समर्थन दिलं होतं. सप्टेंबर 2006मध्ये कोडा आणि अन्य 3 अपक्ष आमदारांनी मुंडा सरकारमधून स्वतःचं समर्थन मागे घेतलं होतं. त्यामुळे अल्पमतात आलेलं भाजपा सरकार कोसळलं. त्यानंतर काँग्रेसशी आघाडी करून त्यांनी सरकार स्थापन केलं आणि त्यावेळी काँग्रेसनं त्यांना मुख्यमंत्रिपदही दिलं होतं.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्यावर निवडणूक लढवण्यास तीन वर्षांची बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 11:23 PM