- एस.पी. सिन्हारांची : झारखंडचे मुख्यमंत्री तथा झारखंड मुक्ती मोर्चाचे (झामुमो) नेते हेमंत सोरेन यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी राज्यातील सत्ताधारी आघाडीतील आमदारांना शनिवारी अज्ञात स्थळी हलविले.
झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद यांच्या आघाडीची सत्ता आहे. या आघाडीतील आमदारांना कडक सुरक्षाव्यवस्थेत ३ बसमधून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. सोरेन यांच्या आमदारकीवर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तसेच भाजपाकडून आघाडीतील आमदार फोडण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे आमदारांना सुरक्षितस्थळी नेले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अज्ञातस्थळी रवाना होण्यापूर्वी आमदारांची एक बैठक मुख्यमंत्री सोरेन यांच्या निवासस्थानी झाली. राज्यात राजकीय संकट निर्माण झाल्यानंतरची आमदारांची ही तिसरी बैठक होती. आमदार बॅगा व कपडे घेऊनच बैठकीला आले होते. बैठकीनंतर आमदारांना बसमध्ये बसविण्यात आले. मुख्यमंत्रीही एका बसमध्ये त्यांच्यासोबत होते. मुख्यमंत्र्यांनी काही सेल्फीही बसमध्ये घेतले.
१० ते १२ आमदार नाहीत संपर्कात?भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी सांगितले की, सोरेन यांच्या बसमध्ये केवळ ३६ आमदार गेले असून, आघाडीतील १० ते १२ आमदार त्यांच्या संपर्कात नाहीत.
पक्षीय बलाबलएकूण - ८१ । सत्ताधारी आघाडी - ४९झामुमो - ३० । काँग्रेस - १८ । राजद - १ । भाजपा -२६ । इतर - ६