- मयूर पठाडेआयपीएलचा झगमगाट आणि जस्टीन बिबरच्या मुंबईवारीत भारतीय क्रिकेटपटू झुलन गोस्वामीची कामगिरी अक्षरश: वाहून गेली असली तरी क्रिकेटचाहत्यांना कायमच तिची आठवण राहील. भारतीय महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीने जबरदस्त कामगिरी करताना आंतरराष्ट्रीय वन डेमध्ये जगात सर्वाधिक बळी मिळण्याची अफलातून कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्यात काल तिनं भारतीय संघाला विजय तर मिळवून दिलाच, पण आपल्या वैयक्तिक कामगिरीचंही शिखरं गाठलं. 34 वर्षीय झुलननं 153व्या वन डे सामन्यांत 181 बळी मिळवून हा विक्रम आपल्या नावे केला. अगोदर ऑस्ट्रेलियाच्या कॅथरिन फिट्जपॅट्रिकच्या नावावर 180 बळींचा विक्रम होता.
भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद भूषवलेल्या झुलन गोस्वामीच्या जोरावर गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय महिला क्रिकेटचा संघ आंतरराष्ट्रीय पातळीवर भरीव कामगिरी करीत आहे. तब्बल 16 वर्षांपासून भारतीय क्रिकेटची धुरा एकहाती आपल्या शिरावर सांभाळणारी झुलन अष्टपैलू खेळाडू आहे. मात्र ही उंची गाठताना अनेक अडचणी आणि आव्हानांचा सामना तिला करावा लागला. हा प्रवास कधीच सोपा नव्हता. परिस्थितीनं तर कधीच हात दिला नाही, पण तिनं आपली जिद्दही कधीच सोडली नाही. घरी खाण्यापिण्याचेही वांदे असतानाही तिनं आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडली.
जाणून घ्या झुलनच्या आयुष्यातील खास गोष्टी
1- नादिया एक्सप्रेस म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवरही झुलनची ख्याती आहे.
2- पाच फूट अकरा इंच उंची असलेल्या झुलनकडे चेंडूला उंची देण्याची कला अवगत आहे.
3- गरिबीत लहानपण गेलेल्या झुलनला मुलांसोबत क्रिकेट खेळावं लागलं. पण त्यामुळे तिच्या क्षमतेत वाढही झाली.
4- मात्र सुरुवातीला अतिशय हळू बॉलिंग टाकत असल्यामुळे तिची खूपदा खिल्लीही उडवली गेली आणि ती टिंगलटवाळीचा विषय झाली होती. पण त्यातूनच तिला प्रेरणा मिळाली आणि ती पेटून उठली. मुलांपेक्षाही वेगात आणि अचूक टप्प्यावर बॉलिंग करू लागली. आज आंतरराष्ट्रीय पातळीवर तेज गोलंदाज म्हणून तिची ख्याती आहे.
5- पश्चिम बंगालमधील नदिया इथली मूळची असलेल्या झुलनला क्रिकेटची प्रॅक्टिस करण्यासाठीही खूप आटापिटा करावा लागला.
6- पहाटे चार वाजता उठून ट्रेननं नादियाहून दक्षिण कोलकातामधील विवेकानंद पार्क येथे ती प्रॅक्टिसासाठी यायची.
7- एक दिवस क्रिकेट खेळून घरी परतायला रात्री उशीर झाला म्हणून तिच्या आईनं तिला कित्येक तास घराबाहेरच ठेवलं होतं.